|Monday, August 26, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » फेसबुकचे वादळ

फेसबुकचे वादळ 

फेसबुक या अतिलोकप्रिय समाज माध्यमाच्या मुद्दय़ावरून सध्या भारतातील राजकीय वर्तुळात चांगलेच रण माजले आहे. आपल्या पाच कोटीहून अधिक उपयोगकर्त्यांची व्यक्तिगत माहिती फोडल्याचा फेसबुकवर आरोप असून या माहितीचा उपयोग भारतातील निवडणुकांमध्ये मतदारांना प्रभावित करण्यासाठी करण्यात आला, असा आरोप आहे. हा आरोप निश्चितच गंभीर असून त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांनी माहिती फुटल्याची जबाबदारी स्वीकारली असून त्याबद्दल क्षमायाचना केली आहे. तसेच भारतातील निवडणुकांमध्ये कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही, असा शब्द दिला आहे. यावरून फेसबुकवर होणारे आरोप सत्य आहेत, हे सिद्ध होते. भाजप आणि काँगेस या दोन्ही पक्षांनी या संबंधात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. या सर्व प्रकरणात केंब्रिज ऍनालिटिका या कंपनीचीही महत्त्वाची भूमिका आहे. ही कंपनी जगभरात विविध राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते यांना राजकीय सल्ला देते. या पक्षांचा आणि नेत्यांचा समाजमाध्यमांवरून प्रचार करते. जनमताचा कल काय याची माहिती आणि त्याबद्दलच विश्लेषण करते. तसेच असे पक्ष आणि नेते यांची ‘प्रतिमा उजळविण्या’चे कंत्राटही या कंपनीकडून घेतले जाते. अलीकडे राजकारण अति स्पर्धात्मक बनल्यामुळे तसेच तो एक फायदेशीर धंदाही झाल्याने पक्ष आणि नेते यांना अशा ‘व्यावसायिक’ कंपन्यांच्या सल्ला मसलतीची व सेवांची आवश्यकता भासते. परिणामी, ते मोठय़ा प्रमाणात पैसा मोजून अशा कंपन्यांना ही कंत्राटे देतात. अशी कामे करून देणारी केंब्रिज ऍनालिटिका ही एकमेव कंपनी नाही, तर अनेक आहेत. त्यांना राजकीय वर्तुळात प्रचंड मागणी आहे. या कंपन्यांमध्ये जास्तीत जास्त ‘ग्राहक’ मिळविण्यासाठी मोठी चुरस असते. त्यामुळे आपल्या ग्राहकाचा जास्तीत जास्त राजकीय लाभ करून देण्यासाठी या कंपन्या कोणत्याही थराला जातात. समाजमाध्यम कंपन्यांकडून त्यांच्या उपयोगकर्त्यांची व्यक्तिगत आणि गुप्त माहिती चोरटय़ा मार्गाने मिळविणे, हा उपद्व्याप त्यांच्याकडून केला जातो. फेसबुकसारख्या लोकप्रिय माध्यमांना हाताशी धरून ही माहिती मिळविली जाते. या माहितीचा उपयोग मतदारांना व्यक्तीशः प्रभावित करण्यासाठी वेगवेगळय़ा पद्धतीने केला जातो. आज समाजमाध्यमे ही राजकीय प्रचाराची प्रमुख आणि परिणामकारक साधने बनली आहेत. निवडणुकीतील वातावरण किंवा कल बदलण्याचेही सामर्थ्य त्यांच्यात असते असे मानले जाते. अगदी अमेरिकेच्या 2016 मध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत समाजमाध्यमांच्या उपयोगावर किंवा गैरवापरावर बरीच चर्चा आज होत आहे. अमेरिकेतील मतदारांना प्रभावित करण्यात रशियाचा हात होता, असेही आरोप होत आहेत. यावरून समाजमाध्यमे ही कशी राजकीय प्रचाराची धारदार शस्त्रे बनली आहेत, याचा अंदाज येतो. भारतात समाजमाध्यमांचा उपयोग करणाऱयांची संख्या तुलनात्मकदृष्टय़ा कमी असली तरी गेल्या पाच सहा वर्षात विविध राजकीय पक्षांनी त्यांचे ‘संगणकीय कक्ष’ स्थापन केले आहेत. माहिती तंत्रज्ञानामध्ये प्रवीण असलेल्यांची नियुक्ती त्यांनी केली आहे आणि समाजमाध्यमांचा उपयोग पक्षप्रचारासाठी कसा जास्तीत जास्त करून घेता येईल, यासाठी हे पक्ष सज्ज असतात. एकंदरीतच, आता इतर क्षेत्रांप्रमाणे राजकीय क्षेत्रातही संगणकीय समाजमाध्यमांचा वावर आणि वापर मोठय़ा प्रमाणात वाढला असून कोणताही पक्ष त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. या वातावरणानेच अनेक बेकायदेशीर प्रकारांना जन्म दिला असून त्यात समाजमाध्यम उपयोगकर्त्यांची माहिती अवैधरित्या विकणे किंवा चोरणे असे प्रकार सर्रास होत आहेत. यामुळे मतदारांनी अधिक सावध राहण्याची आवश्यकता आहे. स्वतःची संवेदनशील व्यक्तिगत माहिती समाजमाध्यमांवर शेअर करताना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा राजकीय पक्ष किंवा त्यांना साहाय्य करणाऱया कंपन्या या माहितीचा गैरफायदा घेऊन मतदारांना केवळ प्रभावितच नव्हे, तर त्यांना ब्लॅकमेलही करू शकतात. सत्ता मिळविण्यासाठी किंवा असलेली टिकविण्यासाठी राजकीय पक्ष कोणत्याही मार्गाचा अवलंब करू शकतात, हे आजवर अनेकदा दिसून आले आहे. म्हणून मतदारांनीच सजग आणि सावध राहण्याची आवश्यकता या माहितीफुटीच्या प्रकरणांमुळे स्पष्टपणे अधोरेखित होते. मतदार आपल्या अधिकारांसंबंधी ठाम असेल तर तो त्याला कोणत्याही बेकायदेशीर मार्गाने प्रभावित होऊ देणार नाही. शेवटी असे मार्ग वापरणाऱयांचे यश मतदाराचा निर्धार किंवा त्याची दुर्बलता यावरच अवलंबून असते. मतदार सुबुद्ध आणि सावध असेल तर त्याची माहिती समाजमाध्यमांच्या हातून इतरांच्या हाती पडली तरी तो विचलित होणार नाही आणि तो तिचा राजकीय गैरवापर करू देणार नाही. समाजमाध्यमांमध्ये जे गैरप्रकार चालतात, ते रोखण्यासाठी कायदे असले तरी केवळ कायद्यांच्या आधारावर ते पूर्णतः रोखणे अशक्यच असते. शिवाय असे कायदे त्या त्या देशांपुरते असतात. पण समाजमाध्यमे जगव्यापी असतात. माहितीच्या आदानप्रदानाने देशांच्या सीमा केव्हाच ओलांडल्या आहेत. पण कायदा मात्र देशाच्या मर्यादेच चालतो. म्हणून कायद्यावर विशेष अवलंबून न राहता स्वतःची काळजी स्वतः घेणे हाच प्रभावी उपाय समाजमाध्यम उपयोगकर्त्याच्या हाती राहतो. समाजमाध्यम हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा उपयोग संयमित पद्धतीने आणि सावधरित्या केल्यास ते वरदान ठरते. तर निष्काळजीपणा दाखविल्यास ते नुकसानकारक ठरू शकते. याचे भान सर्वांनी राखणे आवश्यक आहे. तसे झाल्यास कोणीही, कोणत्याही मार्गाने आणि कोणाही विरोधात त्याचा दुरूपयोग करण्याचे योजले तरी ते प्रयत्न निष्फळ ठरतात. असा कोणताही अवैध आणि बेकायदेशीर प्रयत्न हाणून पाडणे सर्वसामान्यांच्या हाती आहे. आपल्या विवेकबुद्धीचा उपयोग करून हे साध्य करून घेणे सहज शक्य आहे.