|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कोल्हापूर, साताऱयातील दलालांचा पुन्हा रत्नागिरीत ‘राबता’

कोल्हापूर, साताऱयातील दलालांचा पुन्हा रत्नागिरीत ‘राबता’ 

नाणार रिफायनरी ‘जाणार की राहणार?’ ची चर्चा

डिलिंगसाठी विश्रामगृहावर कोल्हापूर, सांगलीतील दलालांचे गुफ्तगू

प्रतिनिधी /रत्नागिरी

राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी परिसरातील जमीन व्यवहारांसाठी रत्नागिरीत परजिल्हय़ातील लॅन्डमाफियांची टीम पुन्हा सक्रिय झाल्याचा पडताळा येत आहे. कोल्हापूर, सातारा येथील या माफियांची टीम व स्थानिक दलालांच्या शासकीय विश्रामगृहावर वाढलेल्या राबत्याने ‘नाणार’ जाणार की राहणार? या बाबतच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.

नाणार परिसरातील जमिनीला प्रस्तावित रिफायनरीमुळे सोन्याचा भाव आला आहे. त्याचवेळी प्रकल्प विरोधास्वरून येथील राजकारणही जोरदार तापलेले आहे. प्रकल्पाच्या विरोधासाठी शिवसेनेने रणशिंग फुंकलेले आहे. ‘स्वाभिमान’नेही प्रकल्पा विरोधासाठी दंड थोपटले आहेत. एकीकडे प्रकल्प विरोधाच्या राजकारणाने उसळी घेतलेली असतानाच रत्नागिरीत नाणार परिसरातील जमिनींचा सौदा करण्यासाठी दलाल मंडळी पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे पुढे येत आहे. नाणार परिसरातील जमिनींसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा व इतर ठिकाणच्या ‘दलाल’ मंडळींचा राबता रत्नागिरीत वाढल्याचे जाणवत आहे. त्यांच्यामार्फत गेल्या काही दिवसांपासून शेकडो एकर जमिनींचे ‘डिलिंग’ पार पडत असल्याचीही चर्चा सुरू आहे.

हे जमिनींचे ‘डील’ सत्ताधारी पक्षाच्या दमतीने सुरू असल्याचा फेब्रुवारीमध्ये फटाका फुटला होता. त्यासाठी शासकीय विश्रामगृहावर कोल्हापूर येथील एका लोकप्रतिनिधीच्या खास माणसांच्या टीमने तळ ठोकलेला होता. त्याला स्थानिक राजकीय नेते व पदाधिकाऱयांचीही साथ लाभल्याची चर्चा होती. सातारा, कोल्हापूर येथील दलालांनी स्थानिक दलालांच्या मदतीने जमीनीची कागदपत्रे कायदेतज्ञांच्या मदतीने मिळवण्यास सुरूवात केल्याचे बोलले जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून यासाठी परिजिल्हय़ातील दलालांच्या टोळक्यांचा राबता वाढलेला आहे.

गेल्या महिन्यात शासकीय विश्रामगृहावर दाखल झालेल्या दलालांच्या टोळक्याची बडदास्त एका जिल्हा पातळीवरील नेत्याने ठेवल्याची चर्चा होती. कोल्हापूरमधील लोकप्रतिनिधी कोण व त्याला मदत करणारा स्थानिक नेता कोण, या बाबत तर्क-वितर्कांना उधाण आले होते. दरम्यान एका महिला लोकप्रतिनिधीकडेही यासंदर्भात बोट दाखवण्यात आले आहे. रिफायनरी परिसरातील सुमारे 600 एकर जमिनीचे व्यवहार अंतिम टप्प्यात गेल्याचे त्यावेळी या व्यवहारात सहभागी असलेल्या एका व्यक्तीकडून सांगण्यात आले होते. या प्रकल्पासाठी 15 हजार एकर जमीन आवश्यक आहे. सुरूवातीच्या काळात अनेकजण चारपट किंमत देऊन जमीन सरकारला देण्यास तयार होते. पण चाकरमानी व प्रकल्पविरोधी समितीच्या आंदोलनानंतर प्रकल्पाचा विरोध तीव्र होऊ लागला.

एकीकडे या प्रकल्पासाठी विरोधाचे राजकीय भांडवल केले जात आहे. मात्र त्या परिसरातील जमिनींच्या सौदेबाजीसाठी दलालांचा सुळसुळाट आजही सुरूच आहे. कोल्हापूर, सातारा येथील गाडय़ांचा ताफा व त्यातून दाखल झालेल्या या मंडळींसोबत स्थानिक दलालांची गुफ्तगूमुळे ‘डिलिंग’च्या चर्चेला खतपाणी मिळत आहेत.