|Sunday, January 26, 2020
You are here: Home » क्रिडा » पावसाच्या व्यत्ययापूर्वी विल्यम्सनचे विक्रमी शतक

पावसाच्या व्यत्ययापूर्वी विल्यम्सनचे विक्रमी शतक 

वृत्तसंस्था/ ऑकलंड

कर्णधार केन विल्यम्सनने किवीज संघातर्फे विक्रमी 18 वे शतक झळकावल्यानंतर इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आणि यामुळे दिवसभरात केवळ 23.1 षटकांचा खेळ होऊ शकला. विल्यम्सनने 91 धावांवरुन डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर लवकरच शतक साजरे केले. पण, त्यानंतर तो फार काळ टिकू शकला नाही. 102 धावांवर असताना त्याला जेम्स अँडरसनने पायचीत केले. अर्थात, दिवसभरात तो बाद होणारा एकमेव फलंदाजही ठरला. येथे दिवसभरात दोनवेळा पावसाने हजेरी लावली. न्यूझीलंडने 4 बाद 229 धावा जमवल्या असताना दुसऱयांदा पावसाचा व्यत्यय आला आणि त्यानंतर एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही.

शुक्रवारी न्यूझीलंडने 3 बाद 175 या पहिल्या दिवसाच्या धावसंख्येवरुन डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर विल्यम्सनला शतक गाठण्यासाठी फारसे प्रयास करावे लागले नव्हते. पण, त्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. 50 मिनिटांनी पुन्हा खेळ सुरु झाल्यानंतर अँडरसनने विल्यम्सनला पायचीत केले. पण, त्यानंतर पुन्हा पाऊस आला व पुढे खेळ होऊ शकला नाही. खेळ थांबवावा लागला, त्यावेळी हेन्री निकोल्स 49 तर बीजे वॅटलिंग 17 धावांवर नाबाद राहिले.

विल्यम्सनने कारकिर्दीतील 18 वे कसोटी शतक साजरे करत असताना मार्टिन क्रो व रॉस टेलर यांचा सर्वाधिक शतकांचा संयुक्त विक्रमही मोडीत काढला. सध्या कसोटी फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी असणाऱया विल्यम्सनला अँडरसनच्या अप्रतिम चेंडूवर बाद होत परतावे लागले. सध्या रॉस टेलर व विल्यम्सन हे दोघेही बहरात असल्याने नजीकच्या कालावधीत सर्वाधिक शतकांच्या यादीत त्यांच्यात चुरस रंगू शकते. मार्टिन क्रोने 1994 मध्ये प्रस्थापित केलेल्या 17 व्या कसोटी शतकाशी सर्वप्रथम विल्यम्सनने मार्च 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लढतीत बरोबरी साधली. त्यानंतर गत डिसेंबरमध्ये रॉस टेलरनेही 17 वे शतक साजरे केले होते. आता विल्यम्सनने हा संयुक्त विक्रम मागे टाकला आहे.

धावफलक

इंग्लंड पहिला डाव : 20.4 षटकात सर्वबाद 58.

न्यूझीलंड पहिला डाव : जीत रावळ झे. बेअरस्टो, गो. अँडरसन 3 (23 चेंडू), टॉम लॅथम झे. वोक्स, गो. ब्रॉड 26 (112 चेंडूत 3 चौकार), केन विल्यम्सन पायचीत गो. अँडरसन 102 (220 चेंडूत 11 चौकार, 1 षटकार), रॉस टेलर झे. वोक्स, गो. अँडरसन 20 (35 चेंडूत 3 चौकार), हेन्री निकोल्स खेळत आहे 49 (143 चेंडूत 3 चौकार), वॅटलिंग खेळत आहे 17 (20 चेंडूत 3 चौकार). अवांतर 12. एकूण 92.1 षटकात 4/229.

गडी बाद होण्याचा क्रम

1-8 (जीत रावळ, 8.2), 2-92 (लॅथम, 37.5), 3-123 (रॉस टेलर, 47.2), 4-206 (विल्यम्सन, 83.6).

गोलंदाजी

जेम्स अँडरसन 20-7-53-3, स्टुअर्ट ब्रॉड 20-5-37-1, ओव्हर्टन 18-7-43-0, ख्रिस वोक्स 23-8-55-0, मोईन अली 11.0-1-34-0.

Related posts: