|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अखेर म्हैसाळ प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन सुरू

अखेर म्हैसाळ प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन सुरू 

प्रतिनिधी/ मिरज

खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे यांनी भाजपा, काँग्रेस पदाधिकारी आणि असंख्य शेतकऱयांच्या उपस्थितीत शनिवारी बटन दाबून म्हैसाळ प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन सुरू केले. शासनाने आपण शेतकऱयांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, हे यानिमित्ताने पुन्हा दाखवून दिल्याचे खासदार संजय पाटील म्हणाले. तर भविष्यात शेतकऱयांनी गावात सोसायटय़ा स्थापन करुन पाणी वाटपाचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन आमदार सुरेश खाडे यांनी केले. आवर्तन सुरू झाल्याने मिरज पूर्व भागासह जत, कवठेमहांकाळ, तासगांव, सांगोला येथील शेतकरी मात्र सुखावला आहे.

34 कोटी रुपयांच्या थकीत वीज बिलामुळे महावितरणने म्हैसाळ प्रकल्पाचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. यामुळे सहा महिन्यांपासून अधिककाळ ही योजना बंद होती. योजनेला टंचाई निधीही मिळत नसल्याने योजना सुरू करण्यात अनेक अडथळे निर्माण झाले होते. शेतकऱयांनाही आर्थिक फटका बसू लागला होता. यामुळे काँग्रेसने शासनाविरोधात आंदोलन हाती घेतले होते. तर खासदार संजय पाटील आणि आमदार सुरेश खाडे यांनी प्रकल्पाच्या थकबाकीसाठी वरिष्ठ पातळीवरुन प्रयत्न सुरू केले होते. प्रारंभी या प्रयत्नांना काही दिवस यश न आल्याने भाजपा वगळता सर्वपक्षांनी एकत्र येऊन शासनाविरोधात आंदोलन हाती घेतले होते. यामध्ये मोर्चा, मोटारसायकल रॅली, रास्तारोको करण्यात आल्यानंतर पाणी संघर्ष यात्रेचेही आयोजन करण्यात आले होते.

याचवेळी खासदार संजय पाटील आणि आमदार सुरेश खाडे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या स्वनिधीतून 50 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी त्यास संमतीही दिली. पण जलसंपदा मंत्र्यांनी मात्र 50 कोटी इतका निधी देण्यास असमर्थता दर्शविली होती. बरेच दिवस प्रयत्न करुनही निधी उपलब्ध होत नसल्याने संतप्त झालेल्या खासदार-आमदारांनी राजीनाम्याचा इशारा दिला होता. त्यामुळे शुक्रवारी महामंडळाच्या स्वनिधीतून म्हैसाळ प्रकल्पास 15 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. याच योजनेसाठी यापूर्वी साडेपाच कोटी रुपयेही देण्यात आली आहेत. 15 कोटी प्राप्त होताच, महावितरणने शुक्रवारी रात्री तात्काळ विद्युत पुरवठा सुरू केला. त्यामुळे आज शनिवारी खासदार संजय पाटील आणि आमदार सुरेश खाडे यांनी बटन दाबून प्रकल्पात पाणी सुरू केले.

सकाळी म्हैसाळ टप्पा क्र. 1 मध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी भाजपाचे प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती अरुण राजमाने, पंचायत समितीच्या सभापती सौ. जनाबाई पाटील, उपसभापती काकासाहेब धामणे, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता हणमंत गुणाले, जी.व्ही.खांडे, एस.एस.नलवडे, जी.टी.वाकुर्डे, एम.आर.जाधव, एस.व्ही.पुजारी, एन.एच.चौगुले, चंद्रकांत कोळी या अधिकाऱयांसह जि.प. सदस्या सौ. प्राजक्ता कोरे, पं.स.सदस्य राहूल सकळे, दिलीपकुमार पाटील, मालगांवचे भाजपा गटनेते प्रदीप सावंत, परशुराम नागरगोजे, उमेश पाटील, ओमासे, एस.आर.पाटील, काँग्रेसचे माजी सभापती अनिल आमटवणे, सलगरे सरपंच तानाजीराव पाटील, उपसरपंच सुरेश कोळेकर, सांगली कृषी उत्पन्नचे सभापती दिनकर पाटील, खंडेराव जगताप, वसंतराव गायकवाड, विजय शिंदे यांच्यासह पूर्व भागातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शासनाने म्हैसाळ योजनेला 15 कोटी रुपयांचा निधी देउढन आपण शेतकऱयांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, हे दाखवून दिले आहे. म्हैसाळ प्रमाणे ताकारी, टेंभूलाही निधी दिला जाणार आहे. म्हैसाळच्या उर्वरीत थकबाकीसाठीही यापुढे पाठपुरावा करुन निधी मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास खासदार संजय पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

सांगली जिह्याचा विकास साधावयाचा असेल, तर सर्वांनी केवळ निवडणुकीपुरत्याच राजकारणाला मर्यादा ठेवल्या पाहिजेत. अन्य कामात राजकारणाला बगल देऊन सर्वांनी हातात हात घालून काम करण्याची गरज निर्माण झाली आहे, असेही ते म्हणाले. म्हैसाळ योजना मिरज पूर्वभागासह जत, कवठेमहांकाळ, तासगांव, सांगोला या तालुक्यासाठी संजीवनी ठरली आहे. शेतकऱयांना वरदान ठरलेल्या या योजनेत कोणीही राजकारण न आणता योजना सक्षमपणे चालवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

शेतकऱयांचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी राजीनाम्याचा इशारा द्यावा लागला. पण आमदार सुरेश खाडे यांना सोबतीला घेऊन हा प्रश्न धसास लावला, असे सांगताना खासदार पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचे खास आभार मानले. भविष्यात अशा योजना सक्षमपणे सुरू राहण्यासाठी शासनाने 81:19 चा फॉर्म्युला अंमलात आणला आहे. त्यामुळे शेतकऱयांना केवळ 19 टक्के पाणी बिल भरावे लागणार असल्याने गावागावातून याचे नियोजन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही खासदार संजय पाटील यांनी केले.

आमदार सुरेश खाडे यांनी, योजनेला निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीष महाजन आणि खासदार संजय पाटील यांचे खास अभिनंदन केले. अनेक अडथळ्यांच्या शर्यतीला तोंड देत शेतकऱयांना न्याय मिळवून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. शेतकऱयांबरोबर सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी भविष्यात सर्वांनी बरोबर जाण्याची भुमिका घ्यावी. केवळ निवडणुकीपुरते राजकारण असावे. म्हैसाळ प्रश्नाबाबत आंदोलन करणाऱयांनी निधी उपलब्धतेला होत असलेल्या दिरंगाईबाबतची तथ्यताही पडताळून पाहणे गरजेचे होते. असे सांगताना आमदार खाडे यांनी आता प्रकल्पात पाणी पडले आहे. त्यामुळे लाभधारक गावातील शेतकऱयांनी सोसायटय़ा स्थापन करुन पाण्याचे योग्य वाटप करण्याची भुमिका घ्यावी, असे आवाहनही केले.

काँग्रेस-भाजपा पदाधिकाऱयांत वादावादी

म्हैसाळ प्रकल्पात पाणी सोडतेवेळी काँग्रेस-भाजपाच्या पदाधिकाऱयांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावली होती. यावेळी पुढे-मागे जाण्याच्या कारणावरुन पंचायत समितीचे माजी सभापती अनिल आमटवणे आणि भाजपा तालुकाध्यक्ष दिनकर भोसले यांच्यात जोरदार वादावादी झाली. यावेळी एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. दोन्ही पक्षांकडील कार्यकर्ते संघटीत झाल्याने कार्यक्रमस्थळी तणाव निर्माण झाला होता. पण खासदारांनी यामध्ये तात्काळ लक्ष घालून त्यावर पडदा टाकला.

Related posts: