|Friday, October 18, 2019
You are here: Home » Top News » राज्याचा पारा चढला

राज्याचा पारा चढला 

पुणे / प्रतिनिधी :

विदर्भ, मराठवाडय़ासह राज्याच्या विविध भागांतील तापमानाचा पारा चढायला सुरुवात झाली असून, महाराष्ट्रातील काही जिल्हय़ांमधील कमाल तापमानाने चाळीशी गाठली आहे. सोमवारी सर्वाधिक तापमान भिरा येथे 45 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.

मार्चपासूनच तापमान वाढायला खऱया अर्थाने सुरुवात होते. मात्र, ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस यामुळे यंदा अनेक भागांतील तापमान मर्यादित राहिले. काही ठिकाणी दुपारी उष्मा आणि रात्री व सकाळी थंडावा, अशी स्थिती पाहायला मिळाली. मात्र, आता उष्मा जाणवण्यास सुरुवात झाली असून, राज्याचा पारा चांगलाच चढू लागल्याचे दिसत आहे. विदर्भ व मराठवाडय़ातील तापमान आताच चाळीसच्या वर गेले आहे. मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांतील तापमानही वाढल्याचे दिसत आहे. गेल्या 24 तासांत राज्यातील कोरडे हवामान राहिले. कोकण व गोव्याच्या काही भागात सरासरीच्या तुलनेत कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली.