|Monday, August 26, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » अखिलाडूवृत्तीचे जनक

अखिलाडूवृत्तीचे जनक 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विजयासाठी अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत झुंजणाऱया पण, केवळ विजयच संपादन करायचा, या एकाच इराद्याने अगदी कितीही खालच्या स्तराला पोहोचण्यात अजिबात कसर न सोडणाऱया ऑस्ट्रेलियन संघाच्या दोन धुरंधरांना बॉल टेम्परिंगच्या निमित्ताने शिक्षेची नामुष्की सोसावी लागली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतात या कारवाईचे स्वागत झाले नसते तरच नवल होते. एक बरे झाले की, कॅमेरुन बॅन्क्रॉफ्टची चलाखी कॅमेऱयाने टिपल्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथने अधिकृतरित्या त्याची जबाबदारी स्वीकारली आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरसह या मालिकेत आपल्या पदावरून पायउतार होण्याची तयारीही दर्शवली. मुळातच, ऑस्ट्रेलियन्स इतके उद्दाम असतात की, चूक कितीही छोटी किंवा मोठी असो, ती मान्य करणे जणू त्यांच्या रक्तातच नसते. इथे स्टीव्ह स्मिथ मात्र त्या तुलनेत थोडा प्रामाणिक आढळून आला. चेंडूची ठेवण बिघडवण्याचा गेमप्लॅन माझाच होता, हे त्याने कबूल केले. अर्थात, आता कॅमेऱयाने हा क्षण टिपला म्हणून. अन्यथा, उद्दाम ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने भविष्यात आणखी असे अनेक प्रमाद बिनदिक्कतपणे केले असते आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगताला त्याची क्वचितच कल्पना आली असती. साधारणपणे बॉल टेम्परिंग यासाठी केले जाते की, त्यामुळे चेंडूचा ‘ऍरोडायनामिक्स’ बदलावा आणि चेंडू अधिक स्विंग व्हावा. आता चेंडू नवा असतो, त्यावेळी स्विंग होतोच. पण, थोडा जुना झाल्यानंतर त्याचा सीम कमी होतो आणि तो पूर्ण जुना होत नाही, तोवर तो  विशेषतः रिव्हर्स स्विंग होत नाही. यासाठीच चेंडूची लकाकी एका बाजूने टिकून रहावी आणि दुसऱया बाजूने ‘रफ’ रहावा, असा खेळाडूंचा प्रयत्न असतो आणि यातूनच बॉल टेम्परिंगसारखे गंभीर प्रकार आजवर होत आले आहेत. खेळाडू चेंडू आपल्याकडे आल्यानंतर तो आपल्या ट्राऊजरवर घासत असतात, याचा तोच अर्थ असतो. आता वनडे क्रिकेटमध्ये दोन्ही बाजूंनी दोन नवे चेंडू वापरले जात असल्याने तेथे बॉल टेम्परिंगला फारसा वाव असत नाही. पण, कसोटीत एकच चेंडू वापरला जात असल्याने तेथे बॉल टेम्परिंगचा अर्थातच फरक पडतो. एमसीसीच्या क्रिकेट नियमांनुसार, चेंडूवर लिप बाम, हेयरजेल किंवा व्हॅसेलिनसारखे बाहय़ घटक लावणे वर्ज्य आहे. पण, तरीही नाना क्लृप्त्या वापरुन ते सुरुच असते, हे सर्वश्रुत आहे. सत्तरीच्या दशकातील मध्यात बिशनसिंग बेदीने इंग्लिश मध्यमगती गोलंदाज जॉन लिव्हरवर असाच ठपका ठेवला होता. जॉन चेंडूला व्हॅसेलिन लावतो, असा बेदीचा आरोप होता. आता बॉल टेम्परिंगचे आरोप अनेक खेळाडूंवर, अनेक संघांवर झाले. पण, 2000 साली वकार युनूस हा बॉल टेम्परिंगप्रकरणी निलंबित केला जाणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला. त्यापूर्वी 1992 मध्ये देखील वासीम आणि वकारवर देखील बरेच आरोप झाले होते. 1994 मध्ये तत्कालीन इंग्लिश कर्णधार मायकल आर्थरटनने बाहय़ घटकासह चेंडूची ठेवण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचे कबूल केले. पण, त्यावेळी तो बाहय़ घटक कोणता, याची माहिती न दिल्याने त्याला 2 हजार युरोचा दंड ठोठावण्यात आला होता. 2005 ऍशेस मालिकेत आपण बॉल टेम्परिंग केल्याचे इंग्लिश फलंदाज मार्कस ट्रेस्कोथिकने आपल्या आत्मचरित्रातून कबूल केले. पण, तोवर बराच कालावधी उलटून गेल्याने त्याचा फारसा गाजावाजा झाला नव्हता. 2010 मध्ये तर कहर झाला, ज्यावेळी तत्कालीन पाकिस्तानी कर्णधार शाहिद आफ्रिदी चेंडूची ठेवण बदलण्यासाठी चक्क चेंडूचा चावा घेताना दिसून आला. अशाच अखिलाडूवृत्तीचा एक भाग म्हणजे, कॅमेरुन बॅन्क्रॉफ्टची चलाखी. ऑस्ट्रेलियापुरते बोलायचे तर त्यांची अशी अखिलाडूवृत्ती जुनीच. अगदी चॅपेल बंधूंपासूनचा इतिहास या अखिलाडूवृत्तीला लाभला आहे. हे चॅपेल बंधू तेच होते, ज्यातील एकाने सांगितले आणि दुसऱयाने त्याचे ऐकत अंडरआर्म गोलंदाजी करत अक्षरशः काळिमा फासला. नंतर तीच परंपरा स्टीव्ह वॉ, रिकी पाँटिंग यांनीही जपली. स्टीव्ह वॉ त्यातल्या त्यात बरा. पण, पाँटिंगने सभ्य खेळाच्या सीमारेषा हजारेवेळा ओलांडल्या आणि त्यासाठी सहकाऱयांना देखील उद्युक्त केले. अर्थात, प्रवाहाखालून बरेच पाणी वाहू जात असताना संदर्भ देखील बदलले आहेत. आता मैदानाच्या कानाकोपऱयात 32 पेक्षा अधिक कॅमेरे विविध क्षण टिपत असतात. त्यामुळे, पाच-पंधरा वर्षांपूर्वी जे राजरोस चालू शकायचे, त्याच्यावर आता बंधने आली आहेत. या निमित्ताने स्मिथसह जो वॉर्नर स्वतःला या प्रकरणातून सहीसलामत बचावण्यासाठी आर्जवे प्रार्थना करतोय, त्याचा इतिहासही थोडा डोकावून पहावा लागेल. 2016-17 च्या हंगामातील होबार्ट कसोटीत फॅफ डय़ू प्लेसिसला 3 डिमेरिट गुण व 100 टक्के मानधन कपातीचा दंड ठोठावण्यात आला. प्लेसिसचा गुन्हा हा होता की, त्याने चेंडूला सॅलिव्हा लावला. पुढे बंदीविरोधात प्लेसिसने दाद मागितली आणि तो इतकेच म्हणाला की, जे अन्य खेळाडू करतात, तेच मी केले. त्यामुळे, ही शिक्षा कमी केली जावी. लवादाला काही प्रमाणात त्याचा युक्तिवाद पटला आणि त्यांनी प्लेसिसची शिक्षा कमी केली आणि आश्चर्याची बाब म्हणजे वॉर्नरने त्यावर कडाडून टीका केली. नियम, बंधने आहेत, म्हणूनच ती पाळायची असतात, असे तो संतापानेच म्हणाला होता. पण, आता आपल्याच संघसहकाऱयाने असा प्रमाद केल्यानंतर साहजिकच स्मिथप्रमाणेच त्याचेही दात त्याच्याच घशात गेले आहेत. अर्थात, स्मिथवर झालेली कारवाई अगदीच किरकोळ मानावी लागेल. आता, स्मिथला आयपीएलमधील नेतृत्व सोडावे लागले असून  ऑस्ट्रेलियन क्रिकेट समितीच्या चौकशीची टांगती तलवार झेलावी लागेलच. पण, आयसीसीने देखील अशा प्रकरणी आणखी कठोर कारवाई करायला हवी. तसे झाले तरच यातून विश्व क्रिकेटमध्ये असा सक्त संदेश जाऊ शकेल की, अशा अखिलाडूवृत्तीला इथे जागा नसेल. जागतिक क्रिकेटची दिशा पाहता, किमान ऑस्ट्रेलियन खेळाडूंबाबतीत तरी आणखी सक्तीने कारवाईची गरजच आहे.