|Saturday, October 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » शत्रू मालमत्ता विक्री प्रक्रियेला प्रारंभ

शत्रू मालमत्ता विक्री प्रक्रियेला प्रारंभ 

तीन महिन्यांमध्ये यादी तयार करण्याचा आदेश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मोदी सरकारने 9400 पेक्षा अधिक ‘शत्रू मालमत्तां’च्या विक्रीची प्रक्रिया सुरू केली आहे. सरकारने या चल आणि अचल शत्रू मालमत्तांची देखरेख करणाऱया कस्टोडियनला तीन महिन्यांत अशा मालमत्तांची यादी सादर करण्याचा निर्देश दिला.

गृह मंत्रालयाने देखील जिल्हा स्तरावर एक मूल्यांकन समिती स्थापन केली असून याचे नेतृत्व जिल्हा दंडाधिकारींकडे असणार आहे. तसेच एक आंतर मंत्रालयीन समिती या प्रकरणांची हाताळणी करणार आहे. या समितीचे अध्यक्षत्व अतिरिक्त सचिवाकडे असून कालबद्धरित्या प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी त्याच्यावर असणार आहे.

शत्रू मालमत्ता अधिनियम 2017 आणि शत्रू मालमत्ता (दुरुस्ती) नियम 2018 नंतर केंद्र सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. फाळणीदरम्यान पाकिस्तान आणि चीनमध्ये जाऊन स्थायिक झालेले आणि तेथील नागरिकत्व प्राप्त करणाऱयांच्या मालमत्तांची विक्री होणार आहे.

पाकिस्तानी नागरिकांद्वारे 9280 मालमत्ता मागे सोडण्यात आल्या आहेत. तर चिनी नागरिकांच्या 126 मालमत्तांची देखील विक्री होणार आहे. या शत्रू मालमत्तांची देखरेख कस्टोडियन करतो. केंद्र सरकारने या कस्टोडियनची नियुक्ती केली आहे.

मालमत्तांच्या मूल्यांकनाकरता जिल्हा स्तरावर मूल्यांकन समिती स्थापन केली जाणार आहे. कस्टोडियन समितीकडून मूल्यांकन अहवाल प्राप्त झाल्यावर केंद्र सरकार शत्रू मालमत्तांची राजनिहाय यादी तयार करणार आहे. शत्रू मालमत्ता देशाच्या अनेक भागांमध्ये आहेत. यात उत्तरप्रदेश, दिल्ली आणि पश्चिम बंगालचा देखील समावेश आहे.