|Saturday, October 19, 2019
You are here: Home » Top News » जीसीएतील घोटाळेबाजांची मालमत्ता जप्त

जीसीएतील घोटाळेबाजांची मालमत्ता जप्त 

प्रतिनिधी/ पणजी

संपूर्ण देशात नाचक्की झालेल्या गोवा क्रिकेट संघटनेच्या (जीसीए) आर्थिक घोटाळय़ात अडकलेले जीसीएचे माजी हायप्रोफाईल अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री दयानंद नार्वेकर, चेतन देसाई, विनोद फडके आणि कित्येक वर्षे जीसीएचे खजिनदार राहिलेल्या अकबर मुल्ला यांची अंमलबजावणी संचालनालयाने (इन्फोर्समेंट डायरेक्टोरेट) सुमारे 4 कोटी 13 लाखांची मालमत्ता जप्त केली आहे.

मनी लाँडरिंगच्या 2002 कायदय़ानुसार गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने या चौघांवरही एफआरआर नोंद केली होती. सर्व चौकशी पूर्ण झाल्यानंतर या चौघांचीही मालमत्ता आता ईडीने जप्त केली आहे. या चौघांवरही ईडीने केलेल्या कारवाईमुळे गोवा क्रिकेट संघटना आता परत एकदा चर्चेत आली आहे. या पार्श्वभूमीवर, काल सोमवारी गोवा क्रिकेट संघटनेच्या पर्वरी येथील मुख्यालयात जीसीएतील काही निवडक सदस्यांची बैठक चालू होती.

गोव्यातील क्रिकेटच्या नावाने स्वतःचे चांगभलं करणाऱया या चौकडींच्या आर्थिक गौडबंगालने केवळ बीसीसीआयचेच नव्हे तर क्रिकेट संबंधीत प्रशासन सांभाळणाऱया  राज्य क्रीडा संघटनांना तसेच बीसीसीआयलाही थक्क केले होते. चिमुकल्या गोव्यात झालेल्या या आर्थिक घोटाळय़ाने गोव्याचे नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेट नकाशावरही या चौघांनी खराब केले. यात चेतन देसाई, बाळू फडके व अकबर मुल्ला यांना तर कित्येक वेळा पोलीस स्थानकात तसेच ईडीच्या कार्यालयातही पाहुणाचार घ्यावा लागला होता.

जीसीएचे 3.87 कोटी वळविले स्वतःच्या खात्यात

2006-07 या आर्थिक साली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गोवा क्रिकेट संघटनेला अनुदान आणि टीव्ही सबसिडीचे सुमारे 6 कोटी 95 लाख दिले होते. मात्र दयानंद नार्वेकर, चेतन देसाई, बाळू फडके व अकबर मुल्ला या जीसीएतील व्यवस्थापकीय मंडळाच्या चौकडीने त्यातील 3.87 कोटी कोणालाही थांगपत्ता न लागू न देता पणजीतील डीसीबी बँक आणि तत्कालीन खजिनदार अकबर मुल्ला याच्या आयडीसी कुंडईतील शिरोडा अर्बन को-ऑप. बॅकमधील खात्यावर जमा केले.

सर्वांनीच घेतली होती, तो मी नव्हेच भूमिका

या घोटाळय़ातील सर्वजण बँकेत असलेली स्वाक्षरी आपणाची नसल्याचे सांगत होते. शिरोर्डा अर्बनचे चेअरमन असलेले अकबर मुल्ला यांनीही आपल्याच बँकेत आपल्याच बनावट स्वाक्षरीने खाते खोलल्याचेही सांगितले आणि तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली. 3.87 कोटीचा व्यवहार जीसीएच्या मासिक बैठकीत, आमसभेत किंवा आर्थिक ताळेबंदातही या घोटाळेबाजांनी दाखविला नाही.

हॅको कंपनीमुळे नार्वेकरांचे उघडे पडले पितळ

या दोन्ही बँकांतील रक्कम विविध व्यक्तींच्या नावांनी जीसीएतील हाय प्रोफाईल चौकडीने बँकेतील अधिकाऱयांना फोन करून काढली. या व्यतिरिक्त दयानंद नार्वेकर यांनीही जीसीएच्या फॅडरल बँकेतील खात्यातून 26 लाख रुपयांची रक्कम मुंबईतील क्रीडा साहित्य विकणाऱया हॅको एंटरप्रायझेसच्या नावाने काढली. प्रत्यक्षात ही रक्कम लॉन मुव्हर्स, बॉलिंग मशीन, क्रिकेट खेळपट्टी कवर तसेच मैदानावरील रोलर्ससाठी काढण्यात आल्याचे दाखविण्यात आले होते. मात्र सखोल चौकशीअंती हॅको इंटरप्राईसेसने जीसीएकडून ही रक्कम आपल्याला मिळालीच नसल्याचे तसेच आम्ही जीसीएला क्रीडा साहित्यही दिले नसल्याचे लेखी दिल्यानंतर या हायप्रोफाईल व्यक्तींचे पितळ उघडे पडले.

गोवा क्रिकेट संघटनेच्या नावानं आपलं चांग भलं करणाऱया दयानंद नार्वेकर, चेतन देसाई, मगो पक्षाचे म्हापसा मतदारसंघाचे पराभूत उमेदवार बाळू फडके व गोवा फॉरवर्डचे पदाधिकारी अकबर मुल्ला ईडीच्या कारवाईमुळे परत एकदा चर्चेत आले आहेत. ईडीच्या कारवाईने परत एकदा संकटात सापडेल्या चेतन देसाई, विनोद फडके आणि अकबर मुल्ला यांना आता राजकीय पाठिंब्यावरच आपली आणखी नाचक्की टाळण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करावी लागत आहे.