|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » निधी खर्ची घालायची ‘वार्षिक घाई’ यंदाही

निधी खर्ची घालायची ‘वार्षिक घाई’ यंदाही 

प्रतिनिधी/ सिंधुदुर्गनगरी

मार्च अखेर म्हटल्यानंतर सर्वच प्रशासकीय कार्यालयांमध्ये कोटय़वधी रुपयांचा निधी खर्च करण्याची लगीन घाई सुरू असते. यावर्षी मार्च अखेरीस सलग दोन सुट्टय़ा आल्याने आणि इंटरनेट सेवा विस्कळीत असल्याने निधी खर्ची घालताना नाकी नऊ आले, मात्र 31 मार्चला एका दिवसात कोटय़वधी रुपये खर्च करण्याची किमया करावी लागणार आहे.

 सिंधुदुर्ग जिल्हय़ाचा 2017-18 चा 158 कोटी रुपये खर्चाचा जिल्हा वार्षिक आराखडा आहे. तसेच जिल्हा परिषदेचा 23 कोटीचा वार्षिक आराखडा आहे. त्याशिवाय इतर विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे 300 कोटी रुपयांचा निधी थेट शासनाकडून येत असतो. अशा प्रकारे एकूण सुमारे 500 कोटी रुपयांच्या जवळपास निधी येतो आणि वेगवेगळय़ा योजना व विकासकामांवर खर्च करण्यात येत असतो. मात्र हा कोटय़वधी रुपयांचा निधी टप्प्याटप्प्याने निधी खर्च करण्याऐवजी बऱयाचवेळा मार्च अखेरीस निधी खर्च होताना दिसतो. 31 मार्चला आर्थिक वर्ष संपल्यानंतर नव्या आर्थिक वर्षासाठी निधी मिळायलाच दोन/तीन महिने जातात. त्यानंतर जून महिन्यापासून पावसाळा सुरु होतो. पावसाळा संपल्यावर कामांचे नियोजन करणे व कामांच्या प्रस्तावांना मंजुरी देणे या सर्व प्रक्रिया पार पाडेपर्यंत मार्च महिना उजाडतो आणि निधी अखर्चित राहू नये म्हणून मग कागदोपत्री का होईना, कोटय़वधी रुपये खर्च करण्याची किमया केली जात असते.

सद्यस्थितीत ऑनलाईन आर्थिक व्यवहार सुरू झाले आहेत. परंतु, महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात दूरसंचार निगमच्या ऑप्टीकल केबल वारंवार तुटत असल्याने इंटरनेट सेवाही वारंवार विस्कळीत होत आहे. याचा फटका सर्वच प्रशासकीय कार्यालयांना बसला आहे. मार्च अखेरच्या दोन-तीन दिवसात कामे आवरायची, तर महावीर जयंती आणि गुड फ्रायडेच्या सलग दोन दिवस सुट्टय़ा आल्याने सर्वच कामे ठप्प झाली. अशा परिस्थितीतही बहुतेक कार्यालये सुरू ठेवली गेली आहेत. परंतु, बँका बंद असल्याने आर्थिक व्यवहार बंद आहेत. आता 31 मार्चचा शेवटचा एक दिवस राहिला आहे. या एका दिवसात मोठा खर्च करण्याची किमया करावी लागणार आहे.

Related posts: