|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » दक्षिण कोरिया-अमेरिकेचा संयुक्त युद्धाभ्यास

दक्षिण कोरिया-अमेरिकेचा संयुक्त युद्धाभ्यास 

उत्तर कोरियाचे मौन : युद्धनौकांचा समावेश, दक्षिण कोरियाचे 3 लाख सैनिक सहभागी

वृत्तसंस्था/ सेऊल

 दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने रविवारी संयुक्त युद्धाभ्यास सुरू केला आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियादरम्यान हा सैन्याभ्यास कोरियन उपखंडात राजनैतिक संबंधांमध्ये सुधारणा झाल्याचे संकेत मिळाले असताना सुरू झाला आहे. या संयुक्त सैन्याभ्यासाला उत्तर कोरियाचा कडवा विरोध राहिला आहे, परंतु यावेळी मात्र त्याने मौन बाळगले आहे.

योनहॅम वृत्तसंस्थेनुसार हा सैन्याभ्यास 4 आठवडय़ांपर्यंत चालणार आहे, ज्यात दक्षिण कोरियाच्या 3 लाख सैनिकांसोबतच अमेरिकेचे 11500 जवान सामील होणार आहेत.

कालावधीत घट

साधारणपणे हा सैन्याभ्यास फेबुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या प्रारंभी होतो, जो 2 महिन्यांपर्यंत चालतो. परंतु फेब्रुवारीमध्ये झालेल्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेमुळे एप्रिलपर्यंत हा सैन्याभ्यास टाळण्यात आला होता. परंतु आता या संयुक्त सैन्याभ्यासाचा कालावधी एक महिन्याचा करण्यात आला आहे. यात सहभागी होणाऱया सैनिकांच्या संख्येत कोणतीही कपात करण्यात आलेली नाही, तसेच सैन्याभ्यासाच्या तीव्रतेत देखील कोणताही बदल झालेला नाही. संयुक्त सैन्याभ्यासात अमेरिकेच्या तसेच दक्षिण कोरियाच्या युद्धनौका सामील आहेत. डबल ड्रगन प्रात्यक्षिकानंतर 23 एप्रिलपासून दोन्ही देशांचे सैनिक ‘की रिजॉल्व्ह’ अंतर्गत अभ्यास करतील, ज्यात अमेरिकेच्या 12000 सैनिकांना युद्धासाठी प्रशिक्षित केले जाईल.

उत्तर कोरियाची भूमिका

या अगोदर दक्षिण कोरियासोबत अमेरिकेच्या संयुक्त सैन्याभ्यासावर तीव्र आक्षेप घेत उत्तर कोरियाने शांततेच्या प्रयत्नांवर विपरित प्रभाव पडणार असल्याचा इशारा दिला होता. परंतु यावेळी मात्र उत्तर कोरियाची भूमिका बदललेली दिसून येतेय. अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्र कमांडने यावेळी पहिल्यांदाच उत्तर कोरियाला या संयुक्त सैन्याभ्यासाच्या वेळापत्रकाची माहिती दिली आहे. तसेच हा नियमित प्रशिक्षणाचा भाग असून याचा उद्देश देशावर आक्रमण करणे नसल्याचे कळविले आहे. हा संयुक्त सैन्याभ्यास उत्तर आणि दक्षिण कोरियादरम्यान 27 एप्रिल रोजी होणाऱया शिखर संमेलनाच्या अगोदर संपणार आहे.

Related posts: