|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » लाच घेताना भूमी अभिलेखचा कर्मचारी दुसऱयांदा रंगेहाथ

लाच घेताना भूमी अभिलेखचा कर्मचारी दुसऱयांदा रंगेहाथ 

धाकू काळेवर 2012 मध्येही झाली होती कारवाई : आकारफोड अहवाल सादर करण्यासाठी मागितली लाच : तीन हजारांची लाच घेताना पकडले

वार्ताहर / मालवण:

सामाईक जमिनीचे आकारफोड करून त्याचा अहवाल तहसील कार्यालयाकडे पाठविण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱया येथील भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार धाकू भैरू काळे (40, रा. परमे, मढाळवाडी, ता. दोडामार्ग) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सिंधुदुर्ग युनिटने सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास रंगेहाथ पकडले. काळे याच्या विरोधात लाचलुचपत अधिनियम 1988 चे कलम 7, 13, (1), () सह कलम 13 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी 2012 मध्ये सावंतवाडी येथे कार्यरत असताना लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी मालवण भूमी अभिलेख कार्यालयात एका अधिकाऱयावर अशाचप्रकारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. त्यानंतर आज पुन्हा या कार्यालयात कारवाई करण्यात आल्याने येथील कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या कारवाईत फिर्यादी असणारी व्यक्ती ही 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक असल्याने ज्येष्ठांनाही शासकीय कार्यालयत मिळत असलेली अन्यायकारक वागणूक यातून समोर आली आहे.

अहवाल पाठविण्यासाठी मागितली लाच

भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार धाकू भैरू काळे याने तक्रारदार यांच्या चुलत काकांच्या सामाईक जमिनीची आकारफोड करून त्याचा अहवाल तहसील कार्यालयाकडे पाठविण्यासाठी तक्रारदारांकडे 5,000 रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 31 मार्च रोजी तक्रार केली होती. सोमवारी दुपारी 12 वाजता काळे याने तडजोडीअंती 3000 रुपयांची रक्कम ठरवली. त्यानुसार तक्रारदार सोमवारी सायंकाळी 3000 रुपये घेऊन काळे याच्याकडे गेला. यावेळी काळे याने ही रक्कम स्वीकारली. यावेळी लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक शंकर चिंदरकर यांनी काळे याला तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईत त्यांच्यासमवेत पोलीस निरीक्षक मितेश केणी, बी. एस. फाले, पप्पू रेवणकर, नीलेश परब, जितेंद्र पेडणेकर, कांचन प्रभू सहभागी झाले होते.

पहिल्या मजल्यावर कारवाई

मालवण भूमी अभिलेख कार्यालयाची दोन मजली इमारत आहे. पहिल्या मजल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईची माहिती खाली असलेल्या कर्मचाऱयांना झाली नव्हती. त्यामुळे अचानक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सर्व अधिकारी कार्यालयात आल्यानंतर अन्य कर्मचाऱयांना कारवाईची माहिती झाली. त्यानंतर नेहमीच गजबजलेल्या कार्यालयात निरव शांतता पसरली होती. सायंकाळच्या सत्रात कार्यालयात येणाऱया अभ्यागतांना मंगळवारी कार्यालयात येण्याची सूचना करण्यात येत होती. कार्यालयात उपस्थित असलेले अधिकारी तणावाखाली असल्याचे दिसून येत होते.

काळे दुसऱयांदा एसीबीच्या जाळय़ात

2012 मध्ये सावंतवाडी येथे कार्यरत असताना काळे याला दहा हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने पकडले होते. त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते. त्यावर सुनावणी होऊन चार महिन्यांपूर्वीच काळे निर्दोषमुक्त झाला होता. सध्या तो मालवण येथे कार्यरत होता. आज पुन्हा एकदा तो एसीबीच्या जाळय़ात अडकला.

सिंधुदुर्गात नवीन वर्षात पाचवी करवाई

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आतापर्यंत सिंधुदुर्गात नवीन वर्षात सहाजणांना लाच घेताना पकडले आहे. यात सदानंद सत्यवान चव्हाण (26) कनिष्ठ अभियंता, बांधकाम विभाग, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग (सार्वजनिक बांधकाम विभाग), श्रीनाथ गोविंद हुल्याळकर (48) दुय्यम निबंधक, श्रेणी-1 देवगड (महसूल विभाग), बापू मारुती तुळसकर (55), मंडळ अधिकारी वेंगुर्ले (महसूल विभाग), अजित पांडुरंग साळुंखे (32) उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, कणकवली, समीर सत्यवान गोलतकर (39), छाननी लिपीक, भूमी अभिलेख कार्यालय, कणकवली (महसूल विभाग) यांचा समावेश आहे. कारवाईत भूमी अभिलेख विभागातील तिघा कर्मचाऱयांचा समावेश आहे.