|Friday, December 6, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » इतिहास-संस्कृतीच्या पैलूंचे दर्शन घडवणारा नावशीचा ‘जागोर’

इतिहास-संस्कृतीच्या पैलूंचे दर्शन घडवणारा नावशीचा ‘जागोर’ 

शेकडो वर्षांच्या इतिहासाची परंपरा असणारा गावडा जागोराचा लोकनाटय़ाचा आविष्कार विस्मृतीच्या उदरात गडप झालेल्या नावशी गावातल्या इतिहास आणि संस्कृतीच्या नानाविध पैलूंचे अत्यंत सुंदररित्या दर्शन नृत्य, नाटय़, गायन आणि वादनाच्या समृद्ध परंपरेतून घडवत आहे.

पोर्तुगीजांनी सोळाव्या शतकात जुन्या काबिजादीत समावेश होणाऱया तिसवाडीतल्या ज्या प्रांतांवरती आपली सत्ता प्रस्थापित केली, तेथे तेथे त्यांनी भूमीपुत्रांची धार्मिक आणि सांस्कृतिक संचिते उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र यशस्वी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले परंतु असे असतानाही कष्टकरी समाजाने आपली लोकसंस्कृती जतन करण्यासाठी तितकाच अपरिमित लढा झुंजारपणे दिला. त्यामुळे आजही बांबोळी येथील गोवा विद्यापीठापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नावशी आणि काक्रा येथील नवहिंदू गावडा जमातीत जागर लोकनाटय़ परंपरेच्या वैविध्यपूर्ण परंपरेचे दर्शन घडते.

वैशाखाचा वणवा कार्यान्वित झाला आणि लईराईची शिरगाव येथील जत्रा संपन्न झाली की, काक्रा आणि नावशी या सागराच्या किनाऱयावर वसलेल्या आणि बेशिस्त सागरी पर्यटनाची शिकार झालेल्या आदिवासी जमातीला जागोराच्या लोकनाटय़ाचे वेध लागतात आणि मे महिन्यातला दुसरा शनिवार आणि रविवारच्या रात्री कर्णमधुर अशा लोकसंगीताने संस्मरणीय होऊ लागतात.

 घुमट, घुमसारख्या पारंपरिक चर्मवाद्यांवरती लोक, वादक विशिष्ट शैलीत ठेका धरतात ते कासाळय़ावरती आणि या सुरेल लोकसंगीतावर ती लोकगीते श्रोत्यांना जागोर लोकनाटय़ातील विविध पात्रांकडे लक्ष केंद्रीत करण्यास भाग पाडतात. जागरातील ठरावीक पात्रे परंपरेने जमातीतील कोणी करावी हे पूर्वापार ठरलेले असते आणि प्रत्येकजण मांडागुरुची कृपा लाभावी म्हणून विधीनाटय़ातून धर्म, संस्कृती यांच्या मूल्यांचे पालन करताना मनोरंजनाबरोबर प्रबोधनाला प्राधान्य देतात. गावडा जागोराची परंपरा एकेकाळी उत्तर गोव्यातल्या बऱयाच गावांमध्ये रूढ होती परंतु पोर्तुगीज अमदानीत झालेल्या धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या गळचेपीत काही ठिकाणची परंपरा विस्मृतीच्या उदरात गडप झाली तर काही ठिकाणी वर्ष परंपरेतला निदान धार्मिक विधी म्हणून सादर करणे गरजेचे मानतात. चार-पाच घुमटे, दोन घुम ही चर्मवाद्ये तन्मयतेने वाजवणारे वादक ज्यात पितळीच्या कासाळेचा उच्च स्वरातला ध्वनी आणि वडिलोपार्जित लोकगीत गायनाचा वारसा आदींच्या मनोज्ञ आविष्कारात रसिक रममाण झालेले असतानाच मातीच्या मांडावरती गराशेर, पारपती, माळी, सोलदार, पाखलो, पाखलीण, खाप्री आदी पात्रे प्रवेश करतात. आपल्या गायन, नृत्य आणि संवादातून या जमातीच्या सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक जीवनातले विविध पैलू पेश करतात.

साळी आणि त्याच्यासोबत नाचणाऱया स्त्रिया म्हणजे श्रीकृष्ण, सत्यभामा आणि रुक्मिणीची रुपे असल्याचे मानले जाते. गावडा जमात शेकडो वर्षांपासून शेती, बागायती, पशुपालनाशी संबंधित असून त्यांच्या जीवनाशी आणि जगण्याशी नाते असणारे त्याचप्रमाणे गावगाडा हाकणारे कलाकार, कारागिरासारखी पात्रे असो अथवा विविधांगी दृष्ये असो या साऱयांतून गावडा जमातीचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास समूर्त होत असतो. सोळाव्या शतकात गोव्यात विशेषतः तिसवाडीत धर्मांतराचा वरवंटा क्रूरपणे फिरवला गेला. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न झाला परंतु असे असताना गावडा जमातीने लोकदैवतांवरची आपली अढळ श्रद्धा टिकवली आणि त्यामुळे ख्रिस्ती धर्माचा त्याग करून हिंदू धर्मात प्रवेश केल्यावरती तुळशीवृंदावनाबरोबर येशू ख्रिस्ताचे प्रतीक असणाऱया क्रॉसचे पूजन फुलांनी सजवून करणे इथले कष्टकरी महत्त्वाचे मानतात.  नमनाची जी लोकगीते गायिली जातात, त्यावेळी ते गातात- प्रुसा जेझु नमन नमन मारियेच्या सुता नमन म्हझे गा समेस्ता जेझु ख्रिस्ताच्या बारा ही भगता

सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात येथील सातेरी-केळबाय आणि लोकदैवतांची मंदिरे उद्ध्वस्त केली. धालो, शिमगो, जागोर यांच्यावरती बंदी घातली. तेव्हा इथल्या जाणकार मंडळींनी येशू ख्रिस्त, मदर मेरी यांचा नमनात उल्लेख करून आणि लोकनाटय़ात पाखलो, पाखलीण, खाप्री, सोलदार ही पात्रे घालून त्याला ख्रिस्ती धर्म आणि संस्कृतीतला एक प्रकार असल्याची भ्रांती निर्माण करून, जागोर सादरीकरणासाठी पोर्तुगीज सरकारची अनुमती मिळविली, असे कवी सुनील पालकर यांनी स्पष्ट केले. आज काळ बदलला तरी पोर्तुगीज अमदानीतील क्रॉसचे पूजन, ख्रिस्ती देवदेवतांना नमन घालण्याची परंपरा कायम आहे. जागोराची नावशी आणि काक्रा येथील परंपरा हिंदू-ख्रिस्ती संचितातून निर्माण झालेल्या संकराचे आणि एकात्मतेचे दर्शन घडवते.

तिसवाडी तालुक्यातील काक्रा, नावशी आदी बांबोळी परिसरातील गावडय़ांची पूर्वापार लोकवस्ती होती. गोव्यात गावडा, कुणबी आणि वेळीप अशा केवळ तीन समुदायांना अनुसूचित जमातींचा दर्जा भारतीय महानिबंधकांकडून प्राप्त झालेला आहे. या गोव्यातल्या तिन्ही आदिवासी जमातीत पूर्वापार सांस्कृतिक आणि सामाजिक अनुबंध आहेत. काक्रा, नावशी येथील जागराचा उत्सव साजरा करणारे गावडा जमातीतले आहेत. सोळाव्या शतकात पोर्तुगीज धर्माधिकाऱयांनी त्यांच्यावरती जुलूम, जबरदस्ती करून त्यांना ख्रिस्ती धर्माची दिक्षा घेण्यास भाग पाडले. त्यानंतर नवख्रिस्त्यांनी आपला ख्रिस्ती धर्म टाकून पूर्वीच्या धर्माकडे वळू नये, यासाठी त्यांचे पूर्वीचे अनुबंध तोडावे म्हणून पोर्तुगीजांनी धर्मसमीक्षण संस्थेला प्राधान्य दिले. धर्मसमीक्षण संस्थेद्वारे त्यांनी तिसवाडी, बार्देश आणि सासष्टीतल्या नवख्रिस्ती समाजाला 1561 ते 1774 व पुन्हा 1779 ते 1822 पर्यंत एकंदर 256 वर्षे नवख्रिस्ती समाजाला अपरिमित छळले. स्थानिकांनी सण, उत्सव, विवाहासारख्या सोहळय़ात जाहीरपणे किंवा खासगीरित्या आपला आनंदोत्सव व्यक्त करताना ओव्यांचे गायन करू नये. त्याचप्रमाणे मिरवणूक आणि उत्सवप्रसंगी ख्रिश्चनाने हिंदूंचा पेहराव करू नये, हिंदूंना त्यात नाचायला, करमणुकीच्या कार्यक्रमात भाग घ्यायला देऊ नये, असे नियम लादण्यात आले होते परंतु असे असताना तिसवाडी तालुक्यातल्या गावडय़ांनी आपल्या लोककला, लोकनाटय़ाच्या परंपरेचे मोठय़ा आत्मीयतेने आणि श्रद्धेने जतन केले.

मसुरकर महाराजांनी ख्रिस्तीकरणात घुसमटमार सोसणाऱया जमातीला हिंदू धर्माची दीक्षा दिली आणि 1930 पासून ही जमात नवहिंदू गावडा म्हणून नावारूपास आली. उन्हाळय़ाचे दिवस आले की या परिसरातले नवहिंदू गावडा आपल्या पूर्वजांकडून लाभलेल्या लोकनाटय़ाच्या वारसाला उजाळा देतात. त्यांच्यातल्या लोकसंस्कृतीच्या उपासकाला आपल्या परिसरातली भूमी ही केवळ अन्नधान्य पुरविणारी पिकाऊ जमीन वाटत नाही तर ती त्यांना देवतास्वरुप भासते. ती लोकजीवनाची सेवाभावी अन्नपूर्णा आहे. सर्जन, सुफलीकरण, संरक्षण आणि समृद्धी यांची ती अधिष्ठात्री देवता आहे, याची जाणीव त्यांना झालेली आहे आणि त्यामुळे सातेरी-केळबाय या दैवतांना वंदन करून जागोर लोकनाटय़ाला प्रारंभ करतात. हिंदू धर्माची दीक्षा घेतली तरी येशू ख्रिस्ताचे प्रतीक असणाऱया पवित्र क्रूसालाही आदरांजली वाहतात. एकेकाळी निसर्गसन्मुख जीवनशैली आणि त्यातून साकार झालेली चराचराची आणि पंचमहाभुतांची पूजा आदी पैलूंचे दर्शन इथल्या गावडा जमातीच्या सांस्कृतिक जीवनातून घडते. नावशी, काक्रा इथे सादर केला जाणारा जागोर आम्हाला आदिवासी लोकधर्म आणि लोकसंस्कृतीचे दर्शन घडवत असतो.

Related posts: