|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » क्रिडा » राष्ट्रकुल : भारत-पाक आज हॉकी लढत

राष्ट्रकुल : भारत-पाक आज हॉकी लढत 

वृत्तसंस्था / गोल्ड कोस्ट

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शनिवारी भारत आणि पाक या पारंपारिक संघामध्ये पुरुष हॉकीचा सामना होणार आहे. पुरुष हॉकी क्रीडा प्रकारातील हा सलामीचा सामना असून या प्राथमिक फेरीतील सामन्याला शौकिनांचा चांगलाच प्रतिसाद लाभेल.

भारतीय पुरुष हॉकी संघाने या स्पर्धेसाठी कसून सराव यापूर्वी केला आहे. भारतीय हॉकी संघाने यापूर्वी या स्पर्धेत दोनवेळा पुरुष हॉकीचे रौप्यपदक मिळविले आहे. ब गटातील शनिवारी होणारा हा सामना अत्यंत चुरशीचा होईल. भारतीय हॉकी संघाने शुक्रवारी येथे बराचवेळ सराव केला. गोल्ड कोस्टमधील हवामान उष्ण असून या सामन्यावेळी कडक उन्हामुळे हॉकीपटूंची दमछाक होईल, असा अंदाज आहे. शनिवारी हा सामना स्थानिक प्रमाणवेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरू होईल.

आठ वर्षापूर्वी या स्पर्धेत उभय संघात शेवटची लढत झाली होती. 2010 च्या दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत झालेल्या सामन्यात भारतीय हॉकी संघाने 7 गोल तर पाकने 4 गोल नोंदविले होते. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत पुरुष हॉकी या क्रीडा प्रकारात या दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. 2006 साली मेलबोर्न येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पाकने भारताच पराभव केला होता. गेल्यावर्षी बांग्लादेशमध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेत या दोन संघामध्ये गाठ पडली होती. ब गटात भारत, पाक, इंग्लंड, वेल्स आणि मलेशिया यांचा समावेश आहे. भारतीय हॉकी संघाला नवे प्रशिक्षक मेरीजीन यांचे मार्गदर्शन लाभत आहे. भारतीय हॉकी संघामध्ये रुपिंदरपालसिंग, हरमनप्रितसिंग, वरूणकुमार आणि रोहिदास हे चार पेनल्टी कॉर्नर आहेत. कर्णधार मनप्रितसिंग मद्यफळीतील जबाबदारी स्वीकारेल. एस. व्ही. सुनिल आणि गुरजंतसिंग यांच्यावर आक्रमणाची जबाबदरी राहिल. पी. आर. श्रीजेश गोलरक्षक आहे.