|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हिरण्यकेशी नदीत चित्रीचे पाणी सोडा

हिरण्यकेशी नदीत चित्रीचे पाणी सोडा 

प्रतिनिधी/   संकेश्वर

हिरण्यकेशी नदीचे पात्र पाण्याअभावी कोरडे पडले आहे. तथापी एप्रिल व मे महिन्यात पाण्याची तीव्र टंचाई भासणार आहे. त्याची दखल घेत एप्रिल व मे या दोन महिन्यात प्रत्येकी दहा दिवस चित्रीचे पाणी सोडावे, अशी मागणी आमदार उमेश कत्ती यांनी केली. सोमवारी मुंबई येथे मुख्यमंत्री सदनात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाण्याच्या मागणीचे निवेदनपत्र दिले आहे.

 निवेदनात, संकेश्वर शहरासह परिसरात असणाऱया 25 खेडय़ांना व नदीच्या पलिकडील महाराष्ट्राच्या हद्दीतील सुमारे दहा खेडय़ांना हिरण्यकेशीचे पाणी एकमेव पर्याय आहे. सध्या उन्हाळी हंगामाने भयावह अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तलाव, विहिरींच्या पाण्याने तळ गाठला आहे. तर हुक्केरी तालुक्यातील हिरण्यकेशीसह घटप्रभा, मार्केंडेय व ताम्रपर्णी पात्र कोरडे पडले आहे. पाण्याचा थेंब नसल्याने नदीचे पात्र वाळवंटासारखे भासू लागले आहे. तेव्हा एप्रिल व मे महिन्यात प्रत्येकी दहा दिवस चित्रीचे पाणी सोडून संकेश्वरवासीयांची तहान भागवावी. तसेच आजरा तालुक्यातील नियोजित आंबेहोळ, सर्पनाला व कितवाट या जलाशयाचे पाणी ही आगामीकाळात हिरण्यकेशीला मिळावे तेही कायमस्वरुपी यासाठी कर्नाटकाच्या वाटय़ाला येणारा निधी आम्ही देऊ करु, अशी ही मागणी यावेळी कत्ती यांनी केली.

 यावेळी महाराष्ट्राचे पाटबंधारे मंत्री विजयबापू शिवतारे, महसूल मंत्री व कोल्हापूर  जिल्हय़ाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, संगम साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष गजानन क्वळ्ळी, अमर नलवडे, संजय शिरकोळी, श्रीकांत हतनुरी आदी मान्यवर उपस्थित होते.