|Friday, October 18, 2019
You are here: Home » उद्योग » 10 वर्षांत पहिल्यांदाच हस्तोद्योग निर्यातीत घसरण

10 वर्षांत पहिल्यांदाच हस्तोद्योग निर्यातीत घसरण 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जीएसटीमध्ये हस्तोद्योगाच्या निर्यातीमध्ये घसरण नोंदविण्यात आली. देशाच्या निर्यातीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱया हस्तोद्योग क्षेत्रात गेल्या 10 वर्षांत पहिल्यांदाच घसरण नोंदविण्यात आली. 2009-10 मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर मंदी आल्याने त्या वर्षात निर्यात घसरली होती. 2017-18 या गेल्या आर्थिक वर्षात हस्तोद्योग निर्यात 6.05 टक्क्यांनी घसरली. या क्षेत्राची निर्यात घसरण्याचे प्रमुख कारण जीएसटी असल्याचे व्यापाऱयांनी म्हटले.

2017-18 या आर्थिक वर्षात हस्तोद्योग क्षेत्राकडून 22,916 कोटी रुपयांच्या वस्तूंची निर्यात करण्यात आली होती. 2016-17 मध्ये ही निर्यात 24,392 कोटी रुपये होती. 2016-17 या आर्थिक वर्षात हस्तोद्योग क्षेत्राच्या निर्यातीमध्ये 13 टक्क्यांनी वाढ झाली होती. या प्रकारात सर्वाधिक निर्यात इमिटेशन ज्वेलरी, हॅन्डप्रिन्टेड टेक्सटाईल, स्कार्फ आणि आर्टमेटल वेयर प्रोडक्टच्या निर्यातीत सर्वाधिक घसरण झाली.

जीएसटी प्रणालीमध्ये निर्यातदारांचा 9 महिन्यांचा रिफंड अडकलेला आहे. यामुळे त्यांच्याकडील खेळत्या भांडवलामध्ये घसरण झाली. हातात भांडवल नसल्याने ऑर्डर्स रद्द करण्यात आल्या आहेत. काही निर्यातदारांनी आपल्याकडील कर्मचाऱयांच्या संख्येत कपात केली असे सांगण्यात आले. पहिल्यांदा कर भरणे आणि त्यानंतर रिफंड गोळा करताना समस्या उद्भवत आहेत, असे सांगण्यात आले.