|Saturday, December 7, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » शीख भाविकांची पाककडून अडवणूक

शीख भाविकांची पाककडून अडवणूक 

राजनैतिक अधिकाऱयांच्या भेटण्यापासून रोखले : परराष्ट्र मंत्रालयाकडून गंभीर दखल

इस्लामाबाद, नवी दिल्ली / वृत्तसंस्था

शीख भाविकांसमवेत तीर्थस्थळी जाण्याच्या भारतीय राजनैतिक अधिकाऱयांच्या आजपर्यंतच्या कार्याला ब्रेक लावण्याचा प्रयत्न पाकिस्तानी अधिकाऱयांनी केला आहे. तसेच भारतीय राजनैतिक अधिकाऱयांना शीख भाविकांना भेटण्यापासूनही रोखण्यात आले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी याप्रकरणी तीव्र शब्दात आक्षेप नोंदवला आहे. यापूर्वीही भारतीय अधिकाऱयांना पाकिस्तानमधील एका क्लबमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता.

भारतातून सुमारे 1800 शीख भाविक बैसाखी उत्सव साजरा करण्यासाठी   रावळपिंडीच्या गुरुद्वारा पंजा साहिबला गेले होते. त्यावेळी भारतीय अधिकाऱयांना पाकिस्तानमध्ये शीख भाविकांना भेटण्यापासून रोखले होते आणि त्यांना राजशिष्टाचाराची अंमलबजावणीही करू दिली नव्हती. यावरून भारत सरकारने आपला आक्षेप नोंदवला होता. दरम्यान, पाकिस्तानने भारतीय राजनैतिक अधिकाऱयांना अत्यंत वाईट वागणूक दिली. ही वर्तणूक राजदूतांबरोबर दुर्व्यवहारच्या श्रेणीत येते. पाकिस्तानची ही कृती म्हणजे व्हिएन्ना परिषद 1961 चे उल्लंघन आहे, असा दावा भारताकडून करण्यात आला आहे.

भारतीय राजनैतिक अधिकाऱयांना भारतातून येणाऱया शीख भाविकांबरोबर तीर्थस्थळी जाणे आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याची सूट असते. ही एक सामान्य प्रक्रिया असून त्यासाठी कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नसते. काऊन्सलर आणि राजशिष्टाचाराशी निगडीत जबाबदारी पाहता भारतीय दुतावासाच्या अधिकाऱयांना ही सूट दिली जाते. वैद्यकीय आपत्कालीन प्रसंगी किंवा कठीण परिस्थिती उद्भवल्यास एकमेकांना मदत करणे हा उद्देश यामागे असला तरी पाकिस्तानने यात खोडा घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पाकिस्तानमध्ये भारतीय राजनैतिक अधिकाऱयांना त्रास देण्याचे सत्र सुरूच असल्याचे यावरून दिसून येत आहे.

Related posts: