|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » तुजवीण वन ओस वाटे

तुजवीण वन ओस वाटे 

भगवंताचा अवतार दुष्टांचे दमन करण्यासाठीच आहे. कालियाचे दमन करण्यासाठी भगवान श्रीकृष्णानी आपले पीतांबर सावरले, कमरेचा शेला घट्ट बांधला आणि ते एका अतिशय उंच अशा कदंबाच्या वृक्षावर चढले. दंड थोपटून तेथून विषारी पाण्यात त्यांनी उडी मारली. सापाच्या विषामुळे यमुनेचे पाणी उकळत होते. त्यावर लाल पिवळय़ा रंगांच्या अत्यंत भयंकर अशा लाटा उसळत होत्या. भगवंताने उडी मारल्याने ते पाणी आणखीनच उसळले. ते आजुबाजूला पसरले. डोहात उडी मारून श्रीकृष्ण बलवान हत्ती प्रमाणे पोहू लागले. त्यावेळच्या त्यांच्या हाताच्या आपटण्याने पाण्यात मोठा आवाज होऊ लागला. कालिया नागाने तो आवाज ऐकला. त्याला लक्षात आले की आपल्या निवासस्थानावर कोणीतरी आक्रमण केले आहे. हे पाहून सहन न झाल्याने तो श्रीकृष्णांच्या समोर आला. त्याने पाहिले की, समोरच एक मेघाप्रमाणे सावळा सुंदर कुमार आहे. त्याच्या वक्षस्थळावर
श्रीवत्सलांच्छन आहे. त्याने पीतांबर परिधान केला आहे. त्याच्या मनोहर चेहऱयावर मंद हास्य झळकत आहे. त्याचे पाय कमळाच्या गाभ्यासारखे कोमल आहेत. इतके असूनही तो येथे निर्भयपणे खेळत आहे. तेव्हा त्याने क्रोधाने श्रीकृष्णांच्या मर्मस्थानी दंश करून त्यांना आपल्या शरीराने वेढून टाकले. नामदेवराय वर्णन करतात- घालीतसे वेढे दिसतसे जळीं ।  आकांत सकळीं मांडियेला ।। गडी रडताती वत्स पळताती ।  कपाळ पिटिती सकळीक ।। तुजवांचोनीयां रक्षी कोण आम्हां।  काय सांगू रामा सकळीक ।। रुसल्या आमुचें करी समाधान ।  तुजवीण वन ओस वाटे ।। आम्हांसाठीं तुवां दुष्टासी मारिलें ।  कोण आतां लळे पुरवील ।। तुजवांचोनियां आम्ही सर्व दीन ।  न जाऊं येथून गोकुळासी ।। वियोगानें तेव्हां पक्षी रडताती ।  आतां कृष्णमूर्ती कैंची आम्हा ।। बोलोनिया ऐसें निस्तेज पडती ।  नदी वाहत होती स्थिरावली ।। नामा म्हणे होती दुश्चिन्हें बहुत ।  गोकुळीं समस्त विचारिती ।।

कालिया नागाने कृष्णाला विळखे घालीत असल्याचे सर्व गोपाळांनी पाहिले. ते पाहून सर्वांनी आकांत मांडला. कृष्ण त्यांचा दुसरा प्राणच नव्हता काय? सवंगडी रडू लागले. वासरांनी माना टाकल्या. अन्यजण कपाळ बडवून घेऊ लागले. ते भगवंताला उद्देशून म्हणू लागले-कृष्णा! तुझ्यावाचून आता आमचे रक्षण कोण करणार? आम्ही सर्वांनी बलरामाला काय सांगावे? आम्ही रुसल्यास तू आमचे समाधान करायचास. तू नसल्यामुळे हे वन आम्हाला ओस वाटत आहे. आमच्यासाठी तू अनेक दुष्टांचा संहार केलास, आता आमचे लाड कोण पुरविणार? तुझ्याशिवाय आम्ही सर्वजण हतबल झालो आहोत. आता आम्ही येथून गोकुळात जाणार नाही. कृष्णाच्या वियोगाने पक्षीही रडू लागले. रडताना ते मनोमन म्हणाले -आता आम्हाला कृष्णदर्शन होणार नाही. असे विचार करत ते सर्वजण म्लान होऊन जमिनीवर पडले. वाहणारी नदीही स्थिरावली. इकडे गोकुळात अनेक प्रकारचे अपशकुन होत होते. ते पाहून गोकुळातील सर्वजण त्या दुश्चिन्हासंबंधी एकमेकांना विचारू लागले असे नामदेवराय म्हणतात.

Related posts: