|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » एक्स्प्रेस रेल्वेंमध्ये चांदीच्या थाळीत मिळणार जेवण

एक्स्प्रेस रेल्वेंमध्ये चांदीच्या थाळीत मिळणार जेवण 

वाराणसी / वृत्तसंस्था :

रेल्वेचा उपक्रम आयआरसीटीसी मोठय़ा योजनेवर विचार करत आहे. योजनेंतर्गत आलिशान रेल्वेगाडय़ांमध्ये चांदीच्या थाळीत जेवण वाढण्याची तयारी केली जात आहे. याकरता सर्व प्रकारच्या प्रारुपांवर विचार होत असून याबद्दलचा प्रस्ताव मुख्यालयात पाठविला जाणार आहे.

सध्या महाराजा एक्स्प्रेसमध्ये ही व्यवस्था मागणीनुसार उपलब्ध केली जात आहे. चांदीच्या थाळीमधून जेवणाचा आनंद सध्या पर्यटकांना मिळत आहे. याच धर्तीवर अन्य आलिशान रेल्वेंमध्ये ही व्यवस्था उपलब्ध करण्याचा विचार केला जात आहे.

रेल्वेंची नावे

फेयरी क्वीन, डेक्कन ओडिसी, हेरिटेज ऑन व्हील्स, पॅलेस ऑन व्हील्स, गोल्डन चेरिअट, राजधानी, शताब्दी, दुरंतो या रेल्वेगाडय़ांमध्ये चांदीच्या थाळीतून जेवण्याचा अनुभव प्रवाशांना घेता येणार आहे.

नवे धोरण लागू होणार

आलिशान रेल्वेंमधून प्रवास करणाऱया लोकांना सुखद अनुभव मिळावा हा यामागचा उद्देश आहे. याचसोबत देशी आणि विदेशी पर्यटक अशा रेल्वेंमधून प्रवास करण्यादरम्यान राजेशाही व्यवस्थेचा आनंद घेऊ शकणार आहेत. खाद्यपदार्थांच्या तक्रारींमुळे बिघडणाऱया प्रतिमेत सुधारणा करण्यासाठी रेल्वे दर दोन तासांनी भोजनाचा पुरवठा करण्याच्या तयारीत आहे. याकरता देशभरात ‘मेगा किचन’ निर्माण करण्यावर चर्चा सुरू असून यांतर्गत नवे धोरण लागू केले जाणार आहे.

ठेकेदारांचे वर्चस्व संपणार

खाद्यपदार्थ आणि पेय उद्योग जगत, स्वयंसहाय्यता गटाचे प्रतिनिधी आणि आयआरसीटीसीच्या अधिकाऱयांची चर्चा झाली आहे. या चर्चेचा उद्देश नवे धोरण लागू करण्यासाठी रोडमॅप तयार करण्याचा आहे. नव्या धोरणात खाद्यपदार्थांची निर्मिती आणि रेल्वेत पुरवठा करण्याचे काम वेगळे केले जाणार आहे. रेल्वे भोजन सेवेतील ठेकेदारांचे वर्चस्व समाप्त होणार आहे. ‘मेगा किचन’मध्ये दररोज 11 लाख प्रवाशांसाठी भोजन तयार होऊ शकेल. आतापर्यंत महाराजा एक्स्प्रेसमध्ये ऑन डिमांड चांदीच्या थाळीत जेवण वाढले जायचे. याची लोकप्रियता पाहता अन्य रेल्वेगाडय़ांमध्ये अशाप्रकारची व्यवस्था निर्माण केली जाईल असे आयआरसीटीसीचे अधिकारी सुबोध श्रीवास्तव यांनी सांगितले.

 

Related posts: