|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जिह्यातून शनिवारी 20 अर्ज दाखल

जिह्यातून शनिवारी 20 अर्ज दाखल 

आतापर्यंत 71 अर्ज, 20 अपक्ष तर 51 राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज 

प्रतिनिधी/ निपाणी

शनिवारी जिह्यातून आणखी 20 अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे आता हा आकडा 71 वर जाऊन पोहोचला असून त्यामध्ये 20 जण अपक्ष असून 51 जण विविध राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार आहेत. गोकाक मतदारसंघातून पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी अर्ज दाखल केला. तर निपाणी मतदारसंघातून संभाजी थोरवत यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.

आता केवळ अर्ज दाखल करण्यासाठी दोनच दिवस उरले आहेत. त्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी आणखी अर्ज दाखल होणार आहेत. त्यानंतर दुसऱया दिवशी छाननी होणार आहे. माघारीनंतरच या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून त्यानंतर विधानसभेच्या रणांगणाला सुरुवात होणार आहे. शुक्रवारी दिवस चांगला असल्यामुळे अनेकांनी आपले अर्ज दाखल केले होते. विधानसभा निवडणूक 12 मे रोजी होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज दाखल करुन अनेक जण प्रचाराच्या कामात लागण्याच्या तयारीत आहेत. पहिल्या दिवशी केवळ 3 अर्ज दाखल झाले तर गुरुवारी केवळ 8 अर्ज दाखल झाले होते. शुक्रवारी मात्र जिह्यातुन मोठय़ा प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आले असून हा आकडा 51 वर पोहोचला होता. तर शनिवारी आणखी 20 अर्जांची भर पडली आहे.

पालकमंत्री जारकीहोळींचा उमेदवारी अर्ज दाखल

घटप्रभा : जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी गोकाक विधानसभेच्या सामान्य क्षेत्रातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून गोकाक तहशिलदार कार्यालयातील निवडणूक अधिकारी दिनेश कुमार जी. टी. यांच्याकडे उमेदवारीचे दोन अर्ज दाखल केले आहेत. गोकाक मतदारसंघातून सतत चार वेळा यापूर्वी त्यांनी विजय संपादन केला आहे. उमेदवार नामपत्र दाखल करताना बंधू उद्योजक लखन जारकीहोळी, जि. पं. सदस्य मडयाप्पा तोळीन्नवर, बीडीसीसी बँक संचालक शिवानंद डोण्णी, यतीनमण्णी उपस्थित होते.

यमकनमर्डीतून एक अर्ज दाखल

हुक्केरी : यमकनमर्डी (मागासवर्ग) या मतदारसंघातून शनिवारी कोण्णूर (ता. गोकाक) येथील भिमाप्पा सिद्धप्पा नाईक यांनी अपक्ष म्हणून आपला नामांकन अर्ज निवडणूक अधिकारी डॉ. कविता योगप्पण्णावर यांच्याकडे सादर केला.

पाचव्या दिवशी निपाणीतून एक अर्ज

  चिकोडी : राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शनिवारी पाचव्या दिवशी निपाणी मतदारसंघातून एक तर चिकोडी-सदलगा विधानसभा मतदारसंघातून एकही अर्ज दाखल झाला नाही. निपाणी मतदारसंघातून संभाजी थोरवत यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.

शनिवारी सकाळचे काही तास एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने हा दिवस अधिकाऱयांसाठी रिकामाच जाणार अशी शक्यता होती. मात्र दुपारी निपाणीतून संभाजी थोरवत यांचा अर्ज दाखल झाला. आतापर्यंत चिकोडी-सदलगा मतदारसंघातून दोन तर निपाणी मतदारसंघातून एक अर्ज दाखल झाला आहे.

रविवारी निवडणूक कार्यालयास सुटी असल्यामुळे अर्ज दाखल करता येणार नाही. आता सोमवार व मंगळवार हे दोन दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राहिले असून आता साऱयांच्या नजरा या दोन दिवसाकडे लागून राहिल्या आहेत.   

दिग्गजांची होणार गर्दी

निवडणूक अर्ज दाखल करणाऱया उमेदवारांचा कल पाहता चिकोडी सदलगा व निपाणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस व भाजप च्या दिग्गजांची बहूदा सोमवार किंवा मंगळवारी गर्दी होणार हे मात्र निश्चित आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना सामान्य वर्गाच्या उमेदवारास 10 हजार रुपये व अनुसूचित जाती जमातीसाठी 5 हजार रुपयांची रक्कम निवडणूक अधिकाऱयांकडे डिपॉजीट करणे गरजेचे असल्याने तसेच ही रक्कम वाढविण्यात आल्याने इच्छूकांना काहीअंशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास इच्छा असून देखील माघार घ्यावी लागत आहे. असा अंदाज व्यक्त होत आहे.