|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » स्वच्छता, प्रभावी प्रशासन व साधनसुविधांना प्राधान्य

स्वच्छता, प्रभावी प्रशासन व साधनसुविधांना प्राधान्य 

प्रतिनिधी/ फोंडा

फोंडा पालिकेसाठी येत्या 29 एप्रिल रोजी होणाऱया निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भाजपा पुरस्कृत ‘फोंडा नागरिक समिती’ने आपला जाहीरनामा काल शनिवारी जाहीर केला. स्वच्छ, हरित व विकसित फोंडा शहर असे घोषवाक्य असलेल्या या जाहीरनाम्यात स्वच्छता, आरोग्य, प्रभावी प्रशासन व साधनसुविधांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. समितीचे निमंत्रक सुनिल देसाई यांनी पत्रकार परिषदेत हा जाहीरनामा सादर केला.

यावेळी पॅनलचे उमेदवार आरविन सुवारीस, विश्वनाथ उर्फ अपूर्व दळवी, व्यंकटेश उर्फ दादा नाईक, शांताराम कोलवेकर, नागेश प्रियोळकर व चंद्रकला नाईक हे उपस्थित होते. स्वच्छता व आरोग्य क्षेत्राला प्राधान्य देताना घरोघरी  कचऱयाची उचल व शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट, चोवीस तास रुग्णवाहिका व शववाहिका उपलब्ध, आवश्यक त्या ठिकाणी सुलभ शौचालय, वेळेत मोन्सूनपूर्व गटारांची व नाल्याची साफसफाई, पावसाच्या पाण्याचा योग्यप्रकारे निचरा तसेच भटकी गुरे व कुत्र्यांची योग्य जागी व्यवस्था लावण्याचे या जाहीरनाम्यात नमूद केले आहे.

प्रशासनामध्ये सुधारणा घडवून आणताना घरपट्टी व इतर कर भरण्यासाठी ऑनलाईन सेवा, सरकारी नियमानुसार आवश्यक दाखले व कागदपत्रे वेळेत उपलब्ध करणे, काही आवश्यक सेवा मोबाईल ऍपद्वारे व नोंदण्यासंबंधी कागदपत्रे डिजिटल इंडियाच्या माध्यमातून उपलब्ध केली जातील.

नियोजित साधनसुविधामध्ये पार्किंग व वाहतूक व्यवस्थापनाचे योग्य नियोजन, पादचाऱयांसाठी सुरक्षित फुटपाथ, जीसुडा व राज्य आणि केंद्र सरकारच्या नियोजित प्रकल्पांची वेळेत उभारणी, बालोद्यान, गार्डन व खुल्या जागांचे सौदर्यींकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्क, काही मोक्याच्या ठिकाणी मोफत व्हायफाय सेवा, एलईडी पथदीप व भूमिगत केबल वाहिन्या, पालिकेची विस्तारीत स्मशानभूमी  चोवीस तास खुली, टेनिस कोर्ट, बास्केटबॉल यासह इनडोअर खेळासाठी क्रीडा संकुल, विविध सुविधांनीयुक्त शास्त्री कमर्शियल आर्केड, योग्य जागेत ट्रक टर्मिनसची उभारणी या विकास कामांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय मार्केट प्रकल्प, बहुउद्देशीय सिग्नेचर प्रकल्प व आधुनिक पद्धतीच्या पालिका उद्योनाचे काम येत्या कार्यकाळात हाती घेण्यात येणार असल्याचेही जाहीरनाम्यात म्हटले आहे. या सर्व गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी नागरिक समितीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन सुनिल देसाई यांनी केले.

मंत्र्याकडून मतदारांना आमिषे : आरविन सुवारीस

आपले पॅनल निवडून देण्यासाठी एका मंत्र्याकडून मतदारांना नोकऱया, सरकारी खात्यामध्ये कंत्राटावर वाहने घेण्याचे व इमारतीला रंगकाम करुन देण्याचे आमिष दाखविले जात असल्याचा आरोप आरविन सुवारीस यांनी केला. फोंडय़ातील मतदार अशा आमिषांन बळी पडणार नाहीत असे ते म्हणाले. मागील निवडणुकीच्यावेळी जाहीरनाम्यात स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन या गोष्टींना  प्राधान्य दिले होते. त्याची गेल्या पाच वर्षांमध्ये बहुतांशी पूर्तता करण्यात आली आहे, असे व्यंकटेश नाईक यांनी सांगितले. यापुढे केवळ फोंडा शहरासाठीच नव्हे शेजारील पंचायतींसाठी कचरा पुर्नप्रक्रिया प्रकल्प व प्लास्टिकमुक्त शहर यावर भर देणार आहे. तसेच सुशिक्षित बेरोजगार युवकांना व्यावसायासाठी विविध योजनांच्या माध्यमातून व्यावसायासाठी प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागेश प्रियोळकर यांनी स्वच्छता, आरोग्य व पार्किंगला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले.

Related posts: