|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » केव्हां मी पाहीन पाडसासी

केव्हां मी पाहीन पाडसासी 

व्रजात यावेळी काय अवस्था झाली याचे वर्णन नामदेवराय करतात-

यशोदा व्याकूळ जाहालीसे प्राणें । सुखी असो तान्हे वनामाजी । । उठती तिडका स्तनीं माझ्या फार ।

लवतसे नेत्र वेळोवेळां । ।जीव तळमळी दाटे माझा घसा । केव्हां मी पाहीन पाडसासी । ।

गोकुळींचे जन निघाले सकळ । पाहाताती गोपाळ वनामघ्यें । ।कालिंदीच्या तीरिं पडिले सकळ ।

पाहोनी कोल्हाळ करीताती । ।कपाळ पिटिती यशोदा रोहिणी । आतां चक्रपाणी कैंचा आम्हां । ।

धांव धांव कृष्णा दावीं रे वदना । पाजूं आतां पान्हा कोणालागीं । ।तुझिया कौतुकें कंठीं मी संसार ।

जळतें अंतर तुजसाठीं । ।कोणावरी आतां घालूं अलंकार । बुडालें हें घर माझें आतां । ।

नामा म्हणे शोकें जाऊं पाहे प्राण । सकळाचें जीवन कृष्णनाथ । ।

महामुनि शुकदेव राजा परिक्षितीला सांगतात-इकडे व्रजात पृथ्वी, आकाश आणि शरीर या तिन्हींमध्ये अतिशय भयंकर असे अपशकुन होऊ लागले. लवकरच एखादी अशुभ घटना घडणार असल्याचे ते सूचक होते. नंद इत्यादी गोपांनी ते अपशकुन पाहिले आणि बलरामाखेरीज श्रीकृष्ण गाई चारण्यासाठी गेला आहे, हे कळताच ते भीतीने व्याकूळ झाले. ते भगवंताचा प्रभाव जाणत नव्हते; म्हणून ते अपशकुन पाहून त्यांच्या मनात आले की, श्रीकृष्णावर मरणप्राय संकट ओढवणार असे दिसते. या विचाराने ते त्याच क्षणी दु:ख, शोक आणि भयाने ग्रस्त झाले. कारण श्रीकृष्णच त्यांचे प्राण, मन होते ना!

अपशकुन जाणून यशोदेचा प्राण व्याकुळ होऊन ती म्हणाली-माझा तान्हा कृष्ण वनात सुखी असू दे. माझे स्तनात दूध दाटून आल्यामुळे ते तटतटू लागले. माझा उजवा डोळा लवू लागला. जीव तळमळून गळा दाटून आला. माझ्या लेकराला मी केव्हा पाहीन असे मला झाले.

व्रजातील मुले, वृद्ध आणि स्त्रिया यांचे कृष्णावर गाईंसारखेच अतिशय प्रेम होते. त्यामुळे ते घाबरून कृष्णाला पाहण्याच्या उत्कट लालसेने गोकुळातून बाहेर पडले. भगवान कृष्णाचे दुसरे रूप असे बलराम ते लोक इतके व्याकूळ झाल्याचे पाहून हसू लागले. परंतु काही बोलले नाहीत. कारण त्यांना धाकटय़ा भावाचा प्रभाव आणि पराक्रम पुरता माहिती होता. ते लोक प्रिय श्रीकृष्णाला शोधू लागले. वाटेतच त्यांना भगवंतांची चरणचिन्हे दिसली. त्या वाटेने यमुनेच्या तीरावर ते जाऊ लागले. वाटेमध्ये गाई आणि इतरांच्या पावलांच्या ठशांव्यतिरिक्त अधून मधून भगवंतांची चरणचिन्हे सुद्धा दिसत होती. त्यावर कमल, जव, अंकुश, व्रज आणि ध्वजाची चिन्हे दिसत होती. ती पाहताच ते लगबगीने चालू लागले. त्यांनी लांबूनच ते भयंकर यातनादायक दृष्य पाहिले. यमुनेच्या डोहात महाभयंकर, विषारी कालिया नागाच्या विळख्यात बांधला गेलेला कान्हा निश्चेष्ट असून नदीच्या तीरावर गोपाळ किंकर्तव्यमूढ अवस्थेत पडलेले आहेत. गुरे आर्त स्वराने हंबरडा फोडीत आहेत. ते पाहून ते सर्व गोप अत्यंत व्याकूळ होऊन मूर्च्छित झाले.

Related posts: