|Thursday, September 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » चर्चेचा प्रस्ताव तालिबानने फेटाळला

चर्चेचा प्रस्ताव तालिबानने फेटाळला 

वृत्तसंस्था /काबूल :

 अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी यांच्याद्वारे मांडण्यात आलेला शांततेचा प्रस्ताव फेटाळत तालिबानने दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वतःचे हल्ले गतिमान करण्याची घोषणा केली आहे. परंतु तालिबानने अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैन्यदलावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे स्पष्ट केले. ‘ऑपरेशन अल खंदक’द्वारे अमेरिकेच्या सैन्यदलांना लक्ष्य करणार असल्याचे तालिबानने जाहीर केले.

साधारणपणे हिवाळय़ात तालिबानकडून हल्ल्यांचे सत्र थांबते आणि उन्हाळय़ात हल्ले पुन्हा सुरू केले जातात. परंतु यंदा तालिबानने वर्षभर अफगाण आणि अमेरिकेच्या सैन्यदलांवरील हल्ले सुरूच ठेवले आहेत. अफगाणिस्तानात अमेरिकेच्या तळांचे अस्तित्व शांततेच्या सर्व संधी नष्ट करते आणि सुरू असलेले युद्ध आणखीन वाढवत असल्याचे तालिबानने म्हटले आहे. तालिबानची घोषणा अप्रत्यक्षपणे चर्चेचा प्रस्ताव फेटाळण्याचा संकेत असल्याचे पाश्चिमात्य तसेच अफगाण तज्ञांचे म्हणणे आहे.

यंदा तालिबान अफगाणिस्तान सरकारला आणखीन कमकुवम करण्याचा प्रयत्न करेल. निवडणूक प्रक्रिया रोखण्यावर तालिबानचा भर असणार असल्याचा दावा अफगाणचे राजनैतिक विश्लेषक आणि काबुल विद्यापीठाचे प्राध्यापक अहमद सईदी यांनी केला. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद रादमनीश यांनी तालिबनची घोषणा केवळ दुष्प्रचार असल्याचे म्हटले.