|Sunday, August 25, 2019
You are here: Home » Top News » तलावात बुडून दोन अल्पवयीन बहिणींचा मृत्यू

तलावात बुडून दोन अल्पवयीन बहिणींचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / पालघर :

पालघरमधील आगवन तलावात बुडून दोन अल्पवयीन सख्या बहिणींचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत मुलींची नावे खुशबू माच्छी आणि सुरक्षा माच्छी अशी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी तलावात आंघोळीला गेले असता पाय घसरल्याने त्या पाण्यात बुडाल्या असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यावेळी स्थानिकांनी तात्काळ या दोन्ही मुलींना पाण्यातून बाहेर काढून पालघरमधील ढवळे रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी दोन्ही मुलींना मृत घोषित केले. त्यानंतर येथील हॉस्पिटल प्रशासनाने पुढील कोणतीही प्रशासकीय कार्यवाही न करताच मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. नातेवाइकांनी मृतदेह घरी नेऊन अंतिम संस्कार आटोपले. या दोघीही जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनी असल्याने सदर बाब सबंधित रूग्णालय प्रशासनाने स्थानिक पोलिस आणि यंत्रणेला कळवणे आवश्यक होते. त्यामुळे याप्रकरणी रूग्णालयाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. दोन्ही मुलींच्या दुर्दैवी मृत्यूने माच्छी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.