|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फोंडा पालिकेवर यंदा बदल निश्चित

फोंडा पालिकेवर यंदा बदल निश्चित 

प्रतिनिधी /फोंडा :

राज्यात म. गो. भाजपाचे सरकार असूनही मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात फोंडा पालिकेवर कार्यरत असलेल्या मगो भाजपा पालिका मंडळाला कुठलाच विकास करता आलेला नाही. कारण मुळात त्यांना जनतेच्या प्रश्नाबाबत स्वारस्य नव्हते. त्यामुळे येत्या पालिका निवडणुकीत मतदारांनी बदल घडवून आणण्याचे आवाहन फोंडय़ाचे आमदार रवी नाईक यांनी केले आहे. 

काँग्रेसचा पाठिंबा असलेल्या फोंडा नागरिक प्रागतिक मंचतर्फे सर्व पंधराही प्रभागामध्ये सुशिक्षित व स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार उभे करण्यात आले आहे. यापैकी बहुतेक नवीन चेहरे आहेत. फोंडा शहराच्या विकासासाठी नवीन बदल घडविताना या सर्व उमेदवारांना फोंडय़ातील नागरिक संधी देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रागतिक मंचचे अध्यक्ष आर. जी. देसाई हे यावेळी उपस्थित होते. गेल्या पाच वर्षांमध्ये एकही विकासाचा प्रकल्प म. गो. भाजपाच्या पालिका मंडळाला पूर्ण करता आलेला नाही. निवडून आलेले काही नगरसेवक लोकांच्या कामांना वेळ देत नसल्याच्याही तक्रारी होत्या. सोपो वसुलीच्या नावाखाली मार्केटमधील सर्वसामान्य व्यापाऱयांवर अन्याय झाला. सध्या जे विकासाचे प्रकल्पांची जाहिरातबाजी केली जाते त्यापैकी बहुतेक प्रकल्प काँगेसच्या काळात हाती घेण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले.

फोंडय़ाचा आमदार म्हणून या पॅनलला आपला पूर्ण पाठिंबा असेल व पुढील पाच वर्षात जनतेसाठी पारदर्शक प्रशासन व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही रवी नाईक यांनी सांगितले. सध्या काही मंत्री मतांसाठी नागरिकांना नोकऱया देण्याचे आमिष दाखवत आहे. काही लोकांना पाण्याच्या टाक्याही वितरीत केल्या जात आहेत. यापूर्वीही विधानसभा निवडणुकीच्यावेळी अशीच खोटी आश्वासने देऊन मते मिळविण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र फोंडय़ातील सुजाण मतदार अशा खोटय़ा आश्वासनाना बळी पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

फोंडा पालिका क्षेत्रात सध्या काही ठिकाणी आचार संहिता लागू असतानाही गटारांची कामे होताना दिसतात. आचार संहितेचा भंग करणाऱया अशा प्रकारांवर निवडणूक आयोगाच्या निरिक्षकांनी लक्ष ठेवण्याची मागणी रवी नाईक यांनी केली.

Related posts: