|Monday, December 9, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » दक्षिण व उत्तर कोरियात अण्वस्त्रमुक्तीचा करार

दक्षिण व उत्तर कोरियात अण्वस्त्रमुक्तीचा करार 

वृत्तसंस्था /सेऊल :

दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या दोन देशांमध्ये संपूर्ण कोरियन द्वीपकल्प अण्वस्त्रमुक्त करण्याचा ऐतिहासिक करार झाला आहे. दोन्ही देशांच्या अध्यक्षांनी येथे या करारावर स्वाक्षऱया केल्या. या कराराची गंभीरपणे अंमलबजावणी झाल्यास जगासमोरचा अणुयुद्धाचा धोका बऱयाच प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दक्षिण कोरियाचे नेते मून जाय इन आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी शुक्रवारी या कराराला मूर्त स्वरूप दिले. जोंग हे दक्षिण कोरियाचा दौरा करणारे 65 वर्षांमधले पहिले नेते ठरले. ही घटनाही या करारारइतकीच ऐतिहासि असल्याचे मत आंतरराष्ट्रीय पत्रकारांनी व्यक्त केले आहे. तसेच या दोन्ही देशांच्या नेत्यांमधली गेल्या 10 वर्षांमधील ही पहिलीच शिखर परिषद आहे.

शुक्रवारी चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त घोषणापत्र प्रसिद्ध केले. त्यात या करारासंबंधी माहिती देण्यात आली आहे. अण्वस्त्रमुक्तीसमवेत पारंपरिक शस्त्रांचे प्रमाण कमी करणे, एकमेकांविरोधातील आक्रमक धोरणे मागे घेणे, संघर्षाचे प्रसंग कमी करणे, दोन्ही देशांमधील सीमारेषा शांतता क्षेत्रात परिवर्तित करणे इतर देशांशी बहुपक्षीय चर्चा प्रक्रिया वेगवान करणे इत्यादी मुद्दय़ांचा या घोषणापत्रात समावेश करण्यात आला.

ट्रंप यांच्या भेटीआधी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि जोंग यांची भेट आणखी काही आठवडय़ांनंतर होणार आहे. त्यापूर्वी हा करार झाल्याने या भेटीसाठी सकारात्मक पार्श्वभूमी तयार झाली आहे. हा करार अमेरिकेच्या पुढाकारानेच झाला असल्याची चर्चा आहे. ‘आज एक महान कार्याला प्रारंभ झाला आहे. भविष्यात हे कार्य पुढे नेण्यासाठी दोन्ही देश उत्तरदायी असतील. हा क्षण शांतता, समृद्धी आणि द्विपक्षीय संबंध यांच्यासाठी ऐतिहासिक ठरणार आहे’ अशी प्रतिक्रिया किम जेंग उन यांच्याकडून व्यक्त करण्यात आली.

जगासाठी आश्चर्य

दोन्ही नेत्यांची भेट आणि करार यामुळे जगाला सुखद आश्चर्याचा धक्का बसला आहे. गेल्या वर्षीपर्यंत दोन्ही देश एकमेकांकडे संघर्षाच्या भूमिकेतून पहात होते. उत्तर कोरियाने अण्वस्त्र चाचणी आणि क्षेपणास्त्र चाचणीचा सपाटा लावला होता. त्यामुळे दक्षिण कोरियासह जपानही सावध झाला होता. अमेरिकेचे नौदल आणि सामरिक आस्थापने या क्षेत्रात आहेत. त्यामुळे अमेरिकेने उत्तर कोरियावर दबाव वाढविण्याचे धोरण आखले होते.

नववर्षातील परिवर्तन

2018 च्या प्रारंभापासून मात्र जोंग यांनी अण्वस्त्र आणि संघर्ष यासंबंधी बरीच सौम्य भूमिका घेण्यास प्रारंभ केल्याचे दिसत आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांशी थेट चर्चा करण्यास मान्यता, दक्षिण कोरियाचा दौरा आणि चाचण्या बंद करण्याचे आश्वासन अशा विविध टप्प्यांमधून उत्तर कोरियाने आपण बदल स्वीकारण्यास तयार आहोत याचे संकेत दिले. परिणामी, वातावरण निवळण्यास प्रारंभ झाला आहे.

Related posts: