|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सामूहिक विवाहासाठीचे प्रयत्न प्रेरणादायी

सामूहिक विवाहासाठीचे प्रयत्न प्रेरणादायी 

धर्मादाय आयुक्त निवेदिता पवार यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी / सावंतवाडी:

सिंधुदुर्गची भौगोलिक, सांस्कृतिक, धार्मिक परंपरा यांची पार्श्वभूमी पाहता सामूदायिक विवाह संकल्पनेच्या पूर्तीसाठी समिती सदस्यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर येथील धर्मादाय आयुक्त श्रीमती निवेदिता पवार यांनी केले. धर्मादाय संस्था सामूदायिक विवाह समिती सदस्य आणि सिंधुदुर्गातील धर्मादाय संस्थांचे प्रतिनिधी यांच्या सभेत त्या बोलत होत्या.

महाराष्ट्र राज्य धर्मादाय आयुक्तांनी समाजातील गरीब, गरजू अशा दारिद्रय़ रेषेखालील विविध समाजातील विवाह इच्छुक तरुण-तरुणी यांच्यासाठी धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून सामूदायिक विवाह समिती जिल्हानिहाय स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल, अतिदुर्बल, गरीब, गरजू पालकांच्या मुलामुलींच्या विवाहासाठी सामूदायिक विवाह सोहळा रविवार 6 मे रोजी सावंत गवळी तिठा येथील वैश्य भवनात आयोजित करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर या सभेचे आयोजन केले होते.

प्रारंभी फादर नेल्सन मच्याडो यांनी कुटुंबातील सात्विक धार्मिक रिती आणि वर्तनाचे महत्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले. समितीने सामूदायिक विवाह सोहळय़ासाठी केलेल्या कार्याचा आढावा सहसचिव डॉ. प्रसाद प्रभूसाळगावकर यांनी घेतला. सामूदायिक विवाह सोहळय़ाच्या नियोजनात येत असलेल्या अडचणी आणि रुढी-परंपरा याबाबतची माहिती अध्यक्ष गणेश ऊर्फ बाळ बोर्डेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली.

समिती सचिव फादर मॅन्युअल डिसिल्वा यांनी ख्रिश्चन धर्मातील विवाहाचे रितीरिवाज आणि परंपरा याबाबत तर फादर ऍलेक्स डिमेलो यांनी ख्रिस्ती कुटुंबातील कॅनन लॉ आधारित आचरण यासंदर्भात विवेचन केले. नवसरणी येथे झालेल्या कार्यक्रमात सहाय्यक धर्मादाय आयुक्त दिवाण, धर्मादाय आयुक्त कार्यालय अधीक्षक अरुण भुईंबर, समिती सदस्य सुरेश बिर्जे, दीपक नाईक, फादर एलायस रॉड्रिग्ज, प्रतिभा पाटणकर, सिंधुदुर्ग धर्मप्रांतातील धर्मगुरू उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिता गावडे यांनी केले. आभार अध्यक्ष गणेश बोर्डेकर यांनी मानले.

Related posts: