|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » बोरजनजीक अपघातात तिघे ठार

बोरजनजीक अपघातात तिघे ठार 

महामार्गावर अपघात मालिका सुरूच

टाटा व्हेंचरची टेम्पोला समोरासमोर धडक,

लग्न सोहळय़ाला जाताना काळाचा घाला,

8 जण जखमी, वाहतुकीचा खोळंबा

वार्ताहर /खेड

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून मंगळवारी गुहागर येथे विवाह सोहळय़ासाठी जाणाऱया तांबे कुटंबीयावर काळाने घाला घातला. ट्रकला ओव्हरटेक करताना तांबे कुटुंबीयांच्या व्हेंचर कारची समोरून येणाऱया टेम्पोशी जोरदार धडक होऊन कारमधील महिलेसह तिघांचा मृत्यू झाला. बोरजनजीक सकाळी 6 च्या सुमारास झालेल्या या अपघातात 8 जण जखमी झाले आहेत.

प्रवीण शिवराम तांबे (33), मिलिंद सुरेश तांबे (29), आर्या मितेश मते (25, सर्व रा. मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. शुभांगी सुरेश तांबे, स्नेहा विनायक तांबे, विनायक सुरेश तांबे, प्रकाश सीताराम तांबे, मयांक मितेश तांबे, वासंती महादेव बारगुडे, सुरेश तांबे (सर्व मूळचें मलांदे-गुहागर, सध्या रा. मुंबई), अमित अरूण नागवेकर (कळंबस्ते-चिपळूण) अशी अपघातात जखमीं झालेल्यांची नावे असून त्यांच्यावर चिपळूण येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रवीण तांबे हे आपल्या नातेवाईकांना मुंबई येथून व्हेंचर कारमधून गुहागर येथील एका लग्न सोहळय़ासाठी येत होते. प्रवीण यांच्या शेजारी मिलिंद तांबे हे बसले होते. त्यांची कार बोरजनजीक आली असता पुढील एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चिपळूण येथून दापोलीकडे कृष्णा दुधाची डिलिव्हरी करण्यासाठी येणाऱया अमित अरूण नागवेकर (रा. कळंबस्ते, चिपळूण) यांच्या 407 टेम्पोवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा होऊन कारमधील प्रवीण तांबे व मिलिंद तांबे हे जागीच ठार झाले. गंभीर जखमी झालेल्या आर्या मते यांना उपचारार्थ चिपळूण येथील रूग्णालयात नेत असतानाच त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक एन. व्ही. जाधव यांनी कर्मचाऱयांसह तसेच येथील मदत ग्रुपचे प्रसाद गांधी व त्यांच्या सहकाऱयांसह स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. व्हेंचर कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना महत्प्रयासाने बाहेर काढून उपचारार्थ हलवण्यात आले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाल्याने चाकरमान्यांसह पर्यटकांचा चांगलाच खोळंबा झाला.

दरम्यान, मच्छींद्र महादेव नाचरे (33, रा. चिपळूण-रानडेआळी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या अपघाताची नोंद येथील पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक एन. व्ही. जाधव अधिक तपास करत आहेत.

Related posts: