|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » घाली अग्नी ज्वाळा मुखामाजी

घाली अग्नी ज्वाळा मुखामाजी 

भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार कालिया आपल्या परिवारासह यमुनेचा डोह सोडून समुद्रातील रमणकद्वीपात राहावयास निघून गेला. नंतर श्रीकृष्ण दिव्य माळा, गंध, वस्त्रे, महामूल्य रत्ने आणि सुवर्णमय अलंकारांनी विभूषित होऊन त्या डोहाच्या बाहेर आले. जसे प्राण परत आल्यानंतर इंद्रिये सचेतन होतात, त्याप्रमाणे, त्यांना पाहून सर्व गोप गोपी उठून उभे राहिले. त्यांची हृदये आनंदाने भरून आली. अतिशय प्रेमाने ते कृष्णाला आलिंगन देऊ लागले. नामदेवराय वर्णन करतात –

आला वनमाळी । मग भेटती सकळी ।।

यशोदा रोहिणी । पोटीं धरिती चक्रपाणी ।।

 गायी धांवताती । कृष्ण अंगातें चाटिती ।।

उडय़ा मारिताती । गडी आनंदें नाचती ।।

न वर्णवे तो आनंद । नामयाची बुद्धि मंद ।।

श्रीकृष्ण, यमुनेच्या डोहातून सुखरूप परत आलेला पाहून सर्व गोकुळवासी त्याला भेटले. यशोदा व रोहिणी यांनी त्याला पोटाशी धरले. गायी धावत आल्या व त्या कृष्णाचे अंग चाटू लागल्या. त्याचे सवंगडी उडय़ा मारू लागले, नाचू लागले. नामदेवराय म्हणतात-माझ्या अल्पबुद्धीला तो आनंद वर्णन करता येत नाही.

झाला अस्तमान तेथेंचि रहाती । ऐकें परीक्षिती अद्?भुत हें ।। निदेनें व्यापिलें असे तेव्हां सर्वां ।  लागला वणवा तया वनीं ।। गायी पळताती पक्षी उडताती । पिलीं पडताती कृष्णापुढें ।। हाहाकार झाला धांव धांव कृष्णा । वांचवीं रे प्राणा सकळांच्या ।। तुझी आम्हीं बाळें वाचवी रें आम्हां । धांव धांव रामा म्हणताती ।। आक्रोशें रडती मारिताती हांका । वैकुंठनायका रक्षीं आम्हां ।। दीनांचा दयाळ मनाचा कोवळा । घाली अग्नी ज्वाळा मुखामाजी।। होतां प्रात:काळ सकळ चालिले। नामा म्हणे आले
गोकुळांशी।।

महामुनी शुकदेव राजा परिक्षितीला सांगतात-हे राजेंद्रा! व्रजवासी लोक आणि गुरे त्यादिवशी अतिशय थकली होती. शिवाय त्यांना तहान भूकही लागली होती. म्हणून त्या रात्री ते यमुना तीरावर झोपले. उन्हाळय़ाचे दिवस होते, त्यामुळे तेथील वनाला वणवा लागला. त्या आगीने झोपलेल्या व्रजवासियांना मध्यरात्री चारी बाजूंनी वेढून घेतले आणि ती आग त्यांना जाळण्यासाठी येऊ लागली. आगीची आच लागल्यामुळे व्रजवासी उठून घाबरून लीला मनुष्य भगवान श्रीकृष्णांना शरण गेले.

ते म्हणाले-हे थोर श्रीकृष्णा! हे अतिशय पराक्रमी बलरामा! पहा! पहा! ही भयंकर आग तुमच्यात असलेल्या आम्हांला जाळू पाहात आहे. हे प्रभो! आम्ही तुमचेच आहोत, म्हणून या भयंकर काळरूप आगीपासून आम्हांला वाचवा. तुमचे सर्वत्र अभय देणारे चरणकमल आम्ही सोडू शकत नाही. श्रीकृष्णांनी सर्वांना सांगितले – आपापले डोळे मिटून घ्या. मी मंत्र जपतो. सर्वांनी डोळे मिटले व ते कान्हय़ाचे ध्यान करू लागले. तेव्हा अनंत शक्तींना धारण करणाऱया जगदीश्वराने विराट रूप धारण केले आणि  स्वजन अशा प्रकारे व्याकूळ झालेले पाहून ती भयंकर आग पिऊन टाकली. नंतर पहाटे सर्वजण आनंदाने गोकुळात परतले.

– ऍड. देवदत्त परुळेकर

Related posts: