|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कोकण रेल्वेच्या 400 कंत्राटी कामगारांचे कामबंद आंदोलन

कोकण रेल्वेच्या 400 कंत्राटी कामगारांचे कामबंद आंदोलन 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

ऊन-वारा-पावसाची कोणतीही तमा न बाळगता कोकण रेल्वेमार्गाच्या सुरक्षेसाठी आम्ही अहोरात्र कर्तव्य बजावतो… कंत्राटी असलो तरी कोकण रेल्वेच्या नियमित कामगारांच्या खांदाला खांदा लावूनच आम्ही काम करतो…मग वेतन व अन्य सुविधांबाबत  आम्हला दुजाभाव का?… असा आर्त सवाल करत कोकण रेल्वेच्या 400 कंत्राटी कर्मचाऱयांनी मंगळवारपासून कामबंद आंदेलन सुरू केले आहे.  देय लाभ मिळाल्याशिवाय आंदोलनातून माघार घेणार नसल्याचा इशारा यावेळी कोकण रेल्वे लेबर युनियनच्यावतीने देण्यात आला आहे.

  कोकण रेल्वे मार्गावर सुमारे 400 कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. कोकण रेल्वेत कायमस्वरूपी कामगारांसोबत हे कंत्राटी कामगार वॉचमन, पेट्रोलमन, गँगमन, मदतनीस तसेच सफाईचे काम करतात. या कामगारांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात कामगार दिनी कामबंद आंदोलन छेडले आहे. अनेक वर्षापासून होत असलेल्या शोषण व फसवणुकिविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटी कामगार आमरण उपोषणाला बसले आहेत. कोकण रेल्वेतील कंत्राटी लेबर पुरविणारे ठेकेदार व त्यांना सहकार्य करणारे कोकण रेल्वेतील अधिकारी यांच्याकडून सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

  या कामगारांना मिनीमम वेजीस ऍक्टनुसार पूर्ण काम व पूर्ण वेतन दिले जात नाही. अनेक वर्षे काम करूनही ओळखपत्र नाही, हजेरी बुक भरून घेतले जात नाही, पगार पत्रक सोडाच साप्ताहीक सुट्टीदेखील नाही, भविष्य निर्वाह निधीबाबतही उदासिनताच असून सुरक्षितेसंदर्भात कोणतीही सुविधा दिली जात नसल्याने कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

  वॉचमन आणि पेट्रोलमन हे रोजचे 16 कि.मी.अंतर चालून 12 तास कर्तव्य बजावतात. पण त्याबदल्यात दिवसाला 216 रुपये हातावर पडतात. महिन्याला एकत्रित 6500 रु. वेतन दिले जाते. एक दिवस सुट्टी घेतल्यास हजेरीच्या दुप्पट वेतन कपात केली जाते. कंत्राटी कामगार पुरवणाऱया व्यक्ती कामगारांच्या वेतनातून अवाढव्य रक्कम कापून घेवून तुटपुंज्या पगार कामगारांच्या हातात देतात. त्यासाठी हा लढा सुरू आहे. त्यासाठी मंगळवारपासून कामबंद आंदोलन छेडण्यात आलेले आहे. जोपर्यंत आमच्या मागण्यांचा विचार होत नाही तोपर्यंत कंत्राटी कामगारांची माघार नसल्याचा इशारा कोकण रेल्वे कंत्राटी लेबर युनियनच्यावतीने देण्यात आला आहे.

Related posts: