|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोपाळ कामत यांच्या चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन

गोपाळ कामत यांच्या चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन 

प्रतिनिधी/ पणजी

सभापती हा नेहमीच निःपक्षपाती असावा म्हणून गोपाळ आपा कामत यांनी सभापतीपद स्वीकारल्यावर मागोपक्षाचा राजीनामा दिला होता. सर्वांना समान हक्क देण्याचा लढा त्यांनी स्वीकारला व त्याप्रमाणे ते वागलेही. एक उत्तम सभापती कसा असावा हे त्यांच्याकडून शिकावे असे प्रतिपादन गोवा विधानसभेचे माजी सभापती सुरेंद्र सिरसाट यांनी केले.

स्वातंत्र्यसैनिक आणि गोवा विधानसभेचे दुसरे सभापती गोपाळ कामत यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्यावरील चरित्रात्मक पुस्तक ‘गोपाळ आपा कामत गौरवांजली’च्या प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी  अध्यक्षस्थानी स्वांतत्र्यसैनिक आणि माजी आमदार रोहिदास हरिचंद नाईक, विशेष अतिथी समीक्षक डॉ. सोमनाथ कोमरपंत, ऍड. सुभाष सावंत, इन्स्टिटय़ुट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष संजय हरमलकर, पुस्तकाचे संपादक सुहास बेळेकर, यांची उपस्थिती होती.

यावेळी प्रा. सोमनाथ कोमरपंत यांनी सांगितले की, गोपाळ आपा कामत हे जरी राजकारणी असले तर त्यांचे त्यांचे व्यक्तीमत्व राजकारणात मावणारे नव्हते. त्यांनी समाजकार्य केले. त्यांच्या जीवनातील प्रत्येक पैलू हा दैदीप्यमान असल्याचेही ते म्हणाले. ऍड. सुभाष सावंत यांनी गोपाळ आपा कामत यांच्याबद्दल आलेले अनुभव कथन केले तर रोहिदास नाईक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

गोमंतक साहित्य सेवक मंडळ आणि इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा आयोजित कार्यक्रमात स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रमात पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी संजय हरमलकर यांनी काढलेल्या गोपाळ कामत यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत सजय हरमलकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. जयप्रभू कांबळी यांनी केले.