|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कृष्णा नदीत मायलेकीची आत्महत्या

कृष्णा नदीत मायलेकीची आत्महत्या 

प्रतिनिधी /नागठाणे:

कोपर्डे (ता.सातारा) येथे कृष्णा नदीत विवाहितेने आपल्या तीन वर्षाच्या मुलीला घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. सौ. क्रांती नितीन सूर्यवंशी (वय 24, रा. हेळगाव, ता.कराड) व कु. वेदिका नितीन सुर्यवंशी (वय 3) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने कोपर्डे परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मृत आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

  याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. क्रांती सुर्यवंशी यांचे सासर हेळगाव (कराड) तर माहेर पाडळी (सातारा) आहे. गेल्या दोन महिन्यांपासून त्या त्यांच्या आजोळी कोपर्डे (ता.सातारा) येथे लहान मुलगी वेदिका हिच्यासह राहत होत्या. गुरुवारी पहाटे त्यांनी आपल्या तीन वर्षांच्या मुलीला स्कार्फने पोटाला बांधून येथील कृष्णा नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. सकाळी ही घटना ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यावर एकच खळबळ उडाली. याची माहिती बोरगाव पोलिसांना समजताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. विवाहितेने तीन वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन आत्महत्या केल्याने येथील ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत होती. उपविभागीय पोलीस अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असुन पुढील तपास सपोनि संतोष चौधरी करत आहेत.