|Monday, September 16, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » बोली भाषांचे सर्वेक्षण

बोली भाषांचे सर्वेक्षण 

भाषा हरवण्याच्या काळात मी मौखिकतेची पाऊल वाट दीर्घ चालू पाहतोय

माझे बोट धरून चालू पाहणाऱया माझ्या मुलीसोबत.

जोपर्यंत मी ओलांडू पाहतोय परंपरेच्या सीमांचे बांध

आणि नाचू पाहतेय भुईतून उगवून येणाऱया कोंबाबरोबर खळाळते पाणी

तोपर्यंत असेलच मौखिकतेची वाणी.

मला माझे शब्द जिवंत राहण्याची नाही वाटत भीती, किंवा मला माझी कविता हरवण्याचीही

एक हरवते कविता, तो कदाचित बोली नष्ट होण्याचाही असतो प्रारंभ

किंवा एक मोठा काळ गोठला जाण्याच्या असंवेदनशीलतेचीही सुरुवात.

एक काळ मागे उभी असते एका पिढीची पुरी हयात. जिला हेही माहीत नसते.

माऊलीच्या पान्हय़ातूनच आपल्या जगण्याला चिकटून आलेला असतो आपल्या बोलीचा शब्द. जिथे आरंभ होतो, मौखिकतेचा आणि जगण्याच्या सृजन सोहळय़ाचाही!

 राज्य मराठी विकास संस्था सध्या भाषेसंदर्भात काही प्रकल्प हाती घेऊन   चांगले काम करीत असताना भाषा नष्ट होण्याच्या पार्श्वभूमीवर भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारी ही कविता. पुनः पुन्हा आठवते आहे. आपली भाषा हरवली म्हणत सगळीकडे मातृभाषा आणि बोली वाचविण्याच्या निव्वळ गप्पा मारल्या जात असताना मराठी विकास संस्थेने प्रथम मराठीत पूर्ण संगणक आणण्याचे प्रयत्न चालविले असताना, दुसरीकडे महाराष्ट्रातील बोलींचे जतन करण्याचा नवा प्रकल्प हाती घेतला आहे. भाषेचे अभ्यासक आपापल्या पातळीवर भाषेसंदर्भात काम करीत असतात पण मराठी विकास संस्थेसारख्या स्वायत्त असणाऱया संस्थेने असे काम हाती घेतले, तर ते अधिक गतिशील होऊ शकते. कारण अशा संस्थेला शासनाचे पाठबळ असते. त्यामुळेच आता मराठी विकास संस्थेने राज्यातील 15 प्रमुख बोलींचे सर्वेक्षण आणि त्यांचे जतन करण्यासाठी चालविलेल्या प्रयत्नांना अधिकाधिक चालना मिळायला पाहिजे.

आपल्याकडे शासन पातळीवरून काहीच होत नाही, असे म्हटले जाते आणि ते खरेही आहे. कारण शासन पातळीवरून भाषेसाठी जे प्रयत्न होत असतात, ते दिखावा असण्याचीच शक्यता जास्त असते. गेल्या पंचवीस वर्षात म्हणजे साधारणतः खुल्या अर्थधोरणानंतर आपल्या देशात आपली मातृभाषा संपून जाण्याची अधिकाधिक भीती व्यक्त केली गेली. अर्थात ती व्यक्त केली जात असतानाच दुसऱया बाजूला इंग्रजीचे महत्त्व वाढीस लागले असल्याचेही दिसून आले. त्यानंतरच्या काळात तर अनेक ठिकाणी दोन उच्चशिक्षित माणसे एकत्र आली, तर ती इंग्रजीत संवाद साधण्यात प्रतिष्ठा मानत असल्याचे सार्वत्रिक चित्र दिसायला लागले. अशावेळी आधी प्रमाण भाषेवर आणि नंतर बोलीवर परिणाम होण्याचीही लक्षणे दिसून आली. विशेषतः याच काळात बोली नष्ट होण्यास प्रारंभ झाला. देशात आजमितीस हजारो बोली बोलल्या जातात. पण त्यातील शेकडो बोली नष्ट झाल्या. ज्येष्ठ भाषातज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या संशोधनानुसार बोली नष्ट होत चालल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता तर पुढील पंचवीस-तीस वर्षात देशातील चार हजार बोली नष्ट होतील, असे भाकितच डॉ. देवी यांनी केले  आहे. यातूनच आपण मातृभाषा आणि तिच्या बोलींवर परकीय भाषेच्या होणाऱया आक्रमणाबाबतची कल्पना करू शकतो. त्यामुळेच मराठी विकास संस्थेने महाराष्ट्रातील बोलींचे सर्वेक्षण-जतन करण्याच्या हाती घेतलेल्या प्रकल्पाला महत्त्व प्राप्त होत आहे. बोलींच्या सर्वेक्षण प्रकल्पात मराठी भाषेतील भौगोलिक आणि सामाजिक स्तरांवर आढळणाऱया काही निवडक व्याकरणीकरण विशेषांचे भाषा वैज्ञानिक पद्धतीने विश्लेषण करण्यात येणार आहे. तसेच नकाशाच्या स्वरुपात त्याचे प्रस्तुतीकरणही केले जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्हय़ातील, तालुक्यातील गावांमध्ये त्या-त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष क्षेत्र पाहणी करणे, मुलाखती घेऊन भाषिक नमुने मिळविणे, त्यांचे प्रतिमांकन आणि भाषावैज्ञानिक विश्लेषण करणे या प्रमुख टप्प्यातून हे काम करण्यात येणार आहे. या प्रकल्पात तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार असून ईलॅन आणि एफलईएक्ससारख्या सॉफ्टवेअरचा वापर करून, माहितीचे व्याकरणिक प्रतिमांकन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे राज्य मराठी विकास संस्था आणि डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था यांच्यातर्फे हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. शासनाने हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी आवश्यक ते सगळे सहकार्य करायला पाहिजे. यापूर्वी भाषेसंदर्भात वेगवेगळे उपक्रम राबविले गेले पण ते पूर्णतः यशस्वी होऊ शकले नाहीत. अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळावा म्हणून जे प्रयत्न केले गेले, तिथेही शासनस्तरावरून जे आवश्यक प्रयत्न करायला पाहिजेत ते अद्याप झालेले दिसत नाहीत. त्यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकला नाही. खरेतर अभिजात मराठी भाषा समितीची स्थापना प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आल्यानंतर अवघ्या दीड-पावणे दोन वर्षांतच मराठी भाषा ही अभिजात भाषा असल्यासंदर्भातला अहवाल समितीने राज्य शासनाकडे सुपूर्द केला होता. त्यानंतर राज्य शासनाने तो केंद्र शासनाकडे पाठविला. त्यानंतर केंद्र शासनाने तो साहित्य अकादमीकडे (दिल्ली) सोपविला. पुढे अकादमीने तज्ञ भाषा समितीकडे अहवाल सोपविल्यानंतर भाषा समितीनेही मराठी भाषा सर्व पुराव्यानिशी अभिजात भाषा असल्याचे एकमुखाने मान्य केले. त्यानंतर तसा अहवाल साहित्य अकादमीनेही संबंधित केंद्रीय मंत्रालयाकडे पाठवून दिला. तरीही अद्याप मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, भाषा मंत्री विनोद तावडे यांनी तीन वर्षांपूर्वी मराठी भाषादिनीच अभिजात भाषेची शासनाकडून घोषणा केली जाईल, असे जाहीर केले, तरी अद्याप त्या घोषणेची पूर्तता झालेली नाही. वास्तविक, केंद्र शासनाच्या संबंधित मंत्रालयाकडून अभिजात भाषेचा दर्जा मराठीला देण्याबाबत कार्यवाही होत नसेल, तर याबाबत लोकमताचा उठाव करण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री या नात्याने तावडे यांनीच पुढाकार घ्यायला हवा होता. तसे झाले असते, तर केंद्र शासनावर दबाव तरी आला असता.

मराठी ही जगातील सहा हजार जिवंत भाषांपैकी पहिल्या सर्वश्रेष्ठ वीस भाषांमध्ये गणली जाते. जगातील एकूण देशांपैकी जवळजवळ 80 देशांमधे मराठी बोलणारी माणसे आहेत. 30 राज्यांपैकी 18 राज्यांमध्ये मराठी बोलणाऱयांची संख्या नोंदपात्र आहे. सुमारे दीड कोटी मराठी बोलणाऱया व्यक्ती जगभर पसरल्या आहेत. त्यामुळे मराठीचा सार्थ अभिमान बाळगावा आणि आपल्या मातृभाषेविषयी तिच्या महानतेला शोभेल, असे आणि तिचा अधिकाधिक विकास होईल, असे साजेसे उपक्रम राबविणे गरजेचे असण्याच्या काळात मराठी विकास संस्थेने बोलीचे सर्वेक्षण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे, त्याचे आपण स्वागतच करायला पाहिजे.