|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » समतेची लढाई अधिक तीव्र करणार

समतेची लढाई अधिक तीव्र करणार 

तेढ, दंग्यातून सत्ताधाऱयांच्या चुकांवर पांघरुण घालण्याचे प्रयत्न : राष्ट्रसेवा दलाचे महामंत्री बाबासाहेब नदाफ यांची माहिती

कणकवली:

आज देशामध्ये जातीय, धार्मिक दंगे घडवून त्याकडे देशाचे लक्ष वेधून सत्ताधाऱयांच्या चुकांवर पांघरुण घालण्याचे काम सुरू आहे. वैचारिक चळवळीतील कार्यकर्त्यांना नक्षलवादी, देशद्रोही ठरविले जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालून संविधानच नाकारले जात आहेत. मात्र, राष्ट्रसेवा दल गेली 76 वर्षे समतेचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवत आहेत. ही समतेची लढाई येत्या काळात अधिक प्रभावी करणार, अशी माहिती राष्ट्रसेवा दलाचे महामंत्री बाबासाहेब नदाफ यांनी दिली. गोपुरी आश्रमात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय प्रशिक्षक शहाजी गोंगाणे, चंदन माटुंगे आदी उपस्थित होते.

नदाफ म्हणाले, आज देशात जातीय दंगे, हिंदू मुस्लीम, दलित सवर्ण असे वाद होत आहेत. सध्याचे सरकार हेखोटं बोला पण रेटून बोलाअसेच आहे. म्हणूनच चुकीचा इतिहास लिहिणाऱयांना पुरस्कार दिले जातात. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी यांच्यासारख्या विचारवंतांच्या हत्या झाल्या. अर्थातच बुलंद असणारा विरोधातील आवाजच बंद करण्याचे काम विद्यमान सत्ताधाऱयांकडून सुरू आहे. देशातील काही वर्ग हा खुनी असलेल्या नथुराम गोडसेची पूजा करतो, ही शरमेची बाब आहे.

सध्याचे सरकार समतेला खतपाणी घालणारे

विद्यमान सरकार हे वैचारिक चळवळीचे विचार मोडून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालत आहेत. यापूर्वीचे सरकार होते त्यावेळी किमान आवाज उठविण्याचे तरी स्वातंत्र्य होते. मात्र, आज धमक्या देणे, चळवळीतील कार्यकर्त्यांना नक्षलवादी, देशद्रोही ठरविणे त्यांना जेलमध्ये घालणे असे प्रकार सुरू आहेत. हे मानवतावादी, समतावादी नव्हे तर विषमतेला खतपाणी घालणारे सरकार आहे. मात्र, आम्ही डगमगता कार्यरत असून येत्या काळात समतेची लढाई अधिक प्रभावी करणार आहोत, असेही नदाफ म्हणाले.

देशावर संविधानाचीच सत्ता हवी!

महाराष्ट्रात 13 हजार प्राथमिक शाळा बंद करून शिक्षणक्षेत्र भांडवलदारांच्या हातात देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिणामी ज्याच्याकडे पैसा आहे, तोच शिक्षण घेऊ शकणार आहे. त्यामुळे शिक्षणाचे खासगीकरण हे सरकारचे षड्यंत्र असल्याचे नदाफ म्हणाले. तर धर्मामुळे माणसा माणसांमध्ये संघर्ष आहे, हे वास्तव आहे. जो धार्मिक माणूस आहे, तो माणूसच असतो. पण, धर्मांध असणारा माणूस नव्हे. म्हणूनच देशावर धर्मग्रंथांपेक्षा संविधानाची सत्ता हवी, असे नदाफ म्हणाले.

आणीबाणीनंतर देशातील परिस्थितीत बदलली होती, त्यावेळी लोकशाहीच्या विकासासाठी राष्ट्रसेवा दलाने काम केले. मुळात आमची चळवळ ही भांडवलदारांच्या विरोधातील आहे. आज जागतिकीकरणात माणसाचे जगणेचबाजारपेठबनलेय. परिणामी सर्वसामान्यांची ससेहोलपट होत आहे. धर्माच्या नावाखाली जेवढय़ा संख्येने येतात तेवढय़ाच संख्येने देशप्रेमापोटी लोक एकत्र येत नाहीत, हे वास्तव आहे. तर राष्ट्रसेवा दलात त्याकाळी होती, तेवढय़ा उंचीची माणसे आज नाहीत. परिणामी मधल्या काही काळात काम काहीसे संथ झाले होते. मात्र, येत्या काळात समतेची लढाई प्रभावीपणे लढणार असल्याचेही नदाफ म्हणाले.