|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » धोबीघाट कारवाईवरून सेनेचा संताप

धोबीघाट कारवाईवरून सेनेचा संताप 

आयुक्तांच्या कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा

न्यायालयाच्या आदेशानंतरही पुनर्वसन रखडलेलेच

मुंबई / प्रतिनिधी

महालक्ष्मी येथील धोबीघाट परिसरातील अनधिकृत बांधकामांवर केलेल्या कारवाईवरून महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना आमनेसामने आले आहेत. दरम्यान, संतप्त झालेल्या प्रभाग समिती अध्यक्षा किशोरी पेडणेकर यांनी आज सोमवारी पालिका आयुक्त कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

महालक्ष्मी स्टेशनजवळील धोबीघाट मुंबईत येणाऱया पर्यटकांचे एक महत्त्वाचे आकर्षण असून गेली सव्वाशे वर्ष हा धोबी अस्तित्वात आहे. धोबी घाट परिसरात कपडे धुण्यासाठी आणि छोटय़ा पायवाटा आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये या पायवाटांवर अतिक्रमणे आणि काही हौदांवर अनधिकृत बांधकामे झाली होती. याचबरोबर काही ठिकाणी अनधिकृत शेड देखील उभारण्यात आले होते. त्यामुळे या धोबी घाट परिसरात कपडय़ांचे गाठोडे घेऊन येणाऱया-जाणाऱयांना चालण्यास अडथळे येत होते. महापालिकेच्या जी/दक्षिण विभागाने मुंबई पोलिसांच्या सहकार्याने 43 अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे. तसेच, ही कारवाई थांबवायचे प्रयत्न करणाऱया सहा लोकांना पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, अनधिकृत बांधकामांवर केलेल्या कारवाईमुळे धोबीघाटमधील नागरिकांच्या बाजूने शिवसेना उतरली आहे. धोबीघाट परिसरातील धोब्यांचे 1 वर्षापूर्वी पुनर्वसन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पुनर्वसन केले नसल्याने ज्या ठिकाणी कपडे सुकवले जातात, त्या दोऱयांच्या बाजूला तात्पुरत्या स्वरूपाची शेड्स बांधली होती. ती शेड्स पालिकेने तोडली आहेत. पालिका अधिकारी बिल्डरांची सुपारी घेऊन गरीब धोब्यांवर कारवाई करत असल्याने पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांविरोधात सोमवारी आयुक्तांच्या कार्यालयात आंदोलन करणार असल्याचा इशारा नगरसेविका तथा प्रभाग समिती अध्यक्षा किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. दरम्यान 2015 पासून जी/दक्षिण या विभागात असलेल्या डेसिग्नेशन ऑफिसर आणि इतर अधिकाऱयांची चौकशी करण्याची मागणी पेडणेकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया

पालिकेच्या जी/दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना अशाच प्रकरणात अंधेरी आणि बोरिवली येथून धक्के मारून हाकलून दिले होते. या अधिकाऱयाने आता गरिब धोब्यांवर कारवाई केली आहे. गरिबांवर हातोडा मारणाऱया या अधिकाऱयांना कमला मिलसारख्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करता येत नाही. सहाय्यक आयुक्त बिल्डरची सुपारी घेऊन कारवाई करत आहेत.

-किशोरी पेडणेकर, नगरसेविका तथा प्रभाग समिती अध्यक्षा

Related posts: