|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » महिला, बाल रुग्णालय पुढील वर्षीपासून सेवेत

महिला, बाल रुग्णालय पुढील वर्षीपासून सेवेत 

  • जिल्हय़ाच्या मध्यवर्ती कुडाळ येथे हॉस्पिटलची उभारणी
  • 14 कोटीच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण
  • उर्वरित 27 कोटी प्राप्त होताच दुसऱया टप्प्याचे काम होणार
  • तज्ञ डॉक्टरांसाठी महिना 50 हजार ते 2 लाखाचे पॅकेज
  • अत्याधुनिक यंत्रणा व तज्ञ डॉक्टर्स राहणार उपलब्ध
  • फक्त महिला व मुलांवरच होणार उपचार

 

शेखर सामंत / सिंधुदुर्ग:

जिल्हा रुग्णालयासारखा स्वतंत्र दर्जा असलेले आणि महिला व मुलांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर तज्ञ डॉक्टरांमार्फत उपचार करू शकणारे कुडाळ येथील 100 खाटांच्या ‘जिल्हा महिला व बाल रुग्णालय’ बांधकामचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. हे रुग्णालय पुढील वर्षभरात रुग्णसेवेसाठी सज्ज होत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

सुमारे 41 कोटी रुपये गुंतवणुकीच्या या अत्याधुनिक रुग्णालयाचा 14 कोटी खर्चाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱया टप्प्याचे 27 कोटी प्राप्त होताच
प्रत्यक्ष रुग्णसेवेस सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

जिल्हय़ात शासकीय स्तरावर महिला व बालचिकित्सा करणाऱया वैद्यकीय अधिकाऱयांचा तुटवडा असल्याने तसेच अत्याधुनिक यंत्रणाच उपलब्ध नसल्याने गोर गरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. तज्ञ डॉक्टरांअभावी काही रुग्णांना प्राणासही मुकावे लागले आहे. गोरगरीब जनतेला खासगी रुग्णालयातून उपचार घेणे परवडत नसल्यामुळे यात ग्रामीण जनतेचे हाल होत आहेत. मात्र, पुढील वर्षीपासून हे दुष्टचक्र काही प्रमाणात थांबणार आहे. कारण या जिल्हय़ातील महिला व बालकांसाठी शासनाकडून प्राप्त झालेल्या जिल्हा रुग्णालय दर्जाच्या या जिल्हा महिला व बालरुग्णालयाचा पहिला टप्पा पुढील वर्षीपासून सुरू होणार आहे. तब्बल 100 खाटांचे हे रुग्णालय जिल्हय़ाच्या मध्यवर्ती असलेल्या कुडाळसारख्या शहरात उभे राहिले असल्याने ते जनतेच्या दृष्टीने खूप सोईचे ठरणार आहे.

तज्ञ डॉक्टर्स अत्याधुनिक सोयी

सदर रुग्णालय इतर रुग्णालयांच्या तुलनेत काहीसे वेगळे असणार आहे. या रुग्णालयात केवळ महिला आणि मुलांच्या आजारांवर उपचार केले जाणार आहेत. महिलांच्या प्रसुतीबरोबरच महिला व बालकांच्या आजारविषयक सर्व शस्त्रक्रिया या ठिकाणी होणार आहेत. या ठिकाणी बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, हृदयरोगतज्ञ व सर्जन नियुक्त केले जाणार आहेत. जिल्हा रुग्णालयाचा दर्जा असलेल्या या रुग्णालयात स्वतःची ब्लड बँक, नवजात अर्भकांचा अतिदक्षता विभाग, स्त्रियांचा अतिदक्षता विभाग, पेडियाट्रिक ओपीडी, गायनॅक ओपीडी, सोनोग्राफी यंत्रणा, एक्स-रे विभाग, रक्ततपासणी विभाग असे सर्व महत्वपूर्ण विभाग उपलब्ध राहणार आहेत.

या ठिकाणी काही तज्ञ डॉक्टर्स हे कायमस्वरुपी नियुक्तीने तर काही डॉक्टर्स खासगी उपलब्ध केले जाणार आहेत. कुडाळ परिसरात खासगी स्तरावर उत्तम सेवा देणारे बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ व हृदयरोगतज्ञ उपलब्ध असल्याने या डॉक्टरांचा उपयोग करून घेतला जाणार आहे.

41 कोटींचे हॉस्पिटल

हे हॉस्पिटल एकूण 41 कोटींचे असून 14 कोटींच्या पहिल्या टप्प्यात तळमजला व पहिल्या मजल्याचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱया टप्प्याचे 27 कोटी प्राप्त होताच पहिल्या टप्प्यातील वीज व पाणी जोडणीची कामे पूर्ण करून त्यानंतर प्रत्यक्ष हॉस्पिटल सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

या इमारतीच्या तळमजल्यावर कन्सल्टेशन विभाग, ब्लड बँक, एक्स-रे विभाग, रक्ततपासणी प्रयोगशाळा, सोनोग्राफी सेंटर, स्टोअर, किचन हे विभाग सुरू करण्यात येणार आहेत. तर पहिल्या मजल्यावर वॉर्ड व शस्त्रक्रिया विभाग रहाणार आहेत. तसेच याच मजल्यावर व्यवस्थापन कार्यालय, बालचिकित्सा विभागदेखील सुरू करण्यात येणार आहे. पेंटिंग, टाईल्स, खिडक्या, प्लास्टरचे काम पूर्ण झाले असून पुढील वर्षभरात हे रुग्णालय निश्चितपणे रुग्णसेवेसाठी सज्ज होणार आहे.

डॉक्टरांचा तुटवडा जाणवणार नाही

दरम्यान, या नव्या रुग्णालयात तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध होतील याची खात्री काय, असा सवाल संबंधित वैद्यकीय सूत्रांना केला असता, जिल्हय़ातील इतर शासकीय रुग्णालयांप्रमाणे या रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची कमतरता जाणवणार नाही. याचे कारण म्हणजे या रुग्णालयासाठी काही डॉक्टर्स हे शासकीय स्तरावर कायमस्वरुपी भरले जाणार आहेत. तर बहुतांश डॉक्टर्स हे खासगी स्तरावरून एमओयू करून घेतले जाणार आहेत. इतर शासकीय रुग्णालयांपेक्षा या विशेष रुग्णालयात सेवा देऊ इच्छिणाऱया खासगी डॉक्टर्सना बेसिक पगार 50 हजार देण्यात येणार असून परफॉर्मन्स, सिझर, प्रसुती पाहून हे पगाराचे पॅकेज महिना दोन लाखापर्यंत वाढवून देण्याची तरतूद शासनाने पेलेली आहे. त्यामुळे या नव्या रुग्णालयाला वैद्यकीय तज्ञांचा तुटवडा जाणवणार नाही, असे सांगण्यात आले. सुदैवाने कुडाळसारख्या शहरात खासगी स्तरावर तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध असल्याने या डॉक्टरांच्या माध्यमातून पुरेसे तज्ञ डॉक्टर्स कायमस्वरुपी उपलब्ध राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Related posts: