|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » येताती धांवोनी नामा म्हणे

येताती धांवोनी नामा म्हणे 

कृष्णाने गोकुळातील गायींनाही कसा लळा लावला होता, याचे वर्णन नामदेवराय करतात –

तृणाचिया लोभें गायी गेल्या दुरी । पाचारी मुरारी नामें त्यांचीं ।।चंद्रभागे गंगे भागीरथी यमुने । येईं ताम्रपर्णे धांवोनियां ।।सरस्वती प्रवरे कालिंदी नर्मदे । येईं तुंगभदे धांवोनियां ।। देवाजीचा शब्द ऐकोनियां कानीं । येताती धांवोनी नामा म्हणे ।।

गवताच्या आशेने गायी चरत चरत खूप दूर गेल्या, तेव्हा कृष्णाने त्यांची नावे घेऊन हाका मारल्या. हे चंद्रभागे, गंगे, भागीरथी, यमुने, ताम्रपर्णें तुम्ही धावत या. हे सरस्वती, हे प्रवरे, हे कालिंदी, हे नर्मदे, हे तुंगभदे तुम्ही सर्वजण धावत या. देवाचा शब्द कानी पडताच सर्व गायी धावून आल्या असे नामदेवराय म्हणतात. नामदेवरायांनी सांगितलेली कृष्णाच्या गायींची नांवे ही नद्यांची नांवे आहेत आणि त्यातही सर्व नद्यांमध्ये नामदेवरायांना चंद्रभागा सर्वात आधी आठवते, कारण ती त्यांना सर्वांत प्रिय आहे. कवीचे मन कवितेतून असेही सहजच व्यक्त होते.

श्रीमद्भागवतात यानंतर वर्षा ऋतूचे सुंदर वर्णन आले आहे. भागवतकारांनी हे वर्णन करताना त्याचा परमार्थाशी कसा सुंदर पट विणला आहे पहा. महामुनी शुकदेव राजा परिक्षितीला वर्णन करून सांगतात-यानंतर वर्षा ऋतू सुरू झाला. यावेळी काळय़ा दाट ढगांमुळे व गडगडाट करणाऱया विजांनी व्यापलेल्या आकाशातील सूर्य, चंद्र आणि तारे झाकोळून जातात. त्यामुळे आकाश, गुणांनी झाकल्या गेलेल्या जीव नामक ब्रह्माप्रमाणे दिसू लागते. (सत्त्वगुणी वीज, रजोगुणी गडगडाट व तमोगुणी ढग आणि ब्रह्मरूप आकाश अशी ही उपमा आहे.)

राजाप्रमाणे सूर्याने पृथ्वीरूप प्रजेकडून आठ महिनेपर्यंत पाण्याच्या रूपाने जो कर वसूल केला होता, तो वेळ आल्यावर सूर्य किरणरूपी हातांनी पुन्हा वाटू लागला.

जसे दयाळू लोक दु:खी लोकांसाठी आपले प्राणसुद्धा समर्पित करतात; त्याप्रमाणे विजा असलेले ढग वेगवान वाऱयाच्या प्रेरणेने प्राण्यांना तृप्त करणारे आपले जीवन (पाणी) देऊ लागतात. जसे सकाम भावाने तपश्चर्या करणाऱयांचे शरीर आधी दुर्बळ होते, परंतु तेच फळ मिळताच पुष्ट होते, त्याप्रमाणे उन्हाने वाळलेली जमीन पावसाच्या पाण्याने ओलीचिंब होऊन पुन्हा फुगली. कलियुगात पापाचे सामर्थ्य वाढल्याने पाखंड मत वाढून वैदिक संप्रदाय लोप पावतो, त्याप्रमाणे पावसाळय़ातील संध्याकाळच्या वेळी ढगांमुळे अंधार पसरल्यामुळे काजवे चमकतात. तारे चमकत नाहीत. जसे नित्य नैमित्तिक कर्मे आटोपल्यानंतर गुरुंच्या आज्ञेनुसार ब्रह्मचारी शिष्य वेदपठण करू लागतात, तसे जे बेडूक आधी गुपचूप झोपून पडले होते, ते आता ढगांची गर्जना ऐकून डराव डराव करू लागले. जसे इंद्रियांवर ताबा नसलेल्या माणसाची शरीर, धन इत्यादी संपत्ती कुमार्गाकडे जाते, तशा सुकून गेलेल्या लहान लहान नद्या आता पात्र सोडून वाहू लागल्या. हिरवळीने हिरवीगार झालेली, काही ठिकाणी पावसाळी किडय़ांनी लाल दिसणारी आणि काही ठिकाणी पावसाळी पांढऱया छत्र्या उगवलेली जमीन अशी दिसत होती की, जणू एखाद्या राजाची रंगीबेरंगी सेनाच!

Related posts: