|Thursday, December 12, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » दुष्ट माणसांचे उपयोग

दुष्ट माणसांचे उपयोग 

दुष्ट माणसं वाईट असतात. त्यामुळे आपल्याला आवडत नाहीत. बरोबर आहे. पण वाईटातून देखील चांगलं काढता येतंच, की नाही? जिवंत असताना दुष्ट माणसं त्रासदायक आणि चांगली माणसे उपयुक्त असतील. पण चांगल्या माणसांचे निधन झाले की त्यांचे पुतळे-स्मारके उभारण्यात जनतेचा पैसा उधळला जातो. शिवाय त्यांची विटंबना झाली की दंगली होतात. दुष्ट माणसांची मात्र गोष्टच न्यारी. दुष्ट माणसे मेली की त्यांचा हवा तसा उपयोग करून घेता येतो.  

रावणाने सीतेचे अपहरण केले आणि पुढचे रामायण घडले. रामाने त्याचा वध केला. रावणाने सीतेचे अपहरण केलेच नसते तर काय झाले असते? दरवषी विजयादशमीच्या दिवशी आपण कोणाचा पुतळा जाळला असता? गडकऱयांच्या ‘संगीत एकच प्याला’मधला तळीराम सुधाकरच्या नाशाला कारणीभूत होतो. पण एखाद्या दारुडय़ाने आपल्याला चारचौघात दुरुत्तरे केली तर आपण त्याला तळीरामच्या नावाने संबोधून गप्प बसवू शकतो. गब्बरसिंग डाकू हा देखील तसा काल्पनिकच. पण दुष्ट आणि नराधम असला तरी शोले सिनेमात धर्मेंद्र-अमिताभपेक्षा तोच जास्त भाव खाऊन गेला. शोले सिनेमा चालू असताना गब्बरसिंगचे संवाद तोंडपाठ असलेली अनेक लहानलहान मुलं मी पाहिलीत. पुढे बिस्किटे आणि तंबाखू वगैरे बनवणाऱया कंपन्यांनी आपली उत्पादने विकण्यासाठी गब्बरसिंगचीच मदत घेतली. गब्बरसिंग नसता तर भाजप सरकारने आणलेल्या जीएसटीवर राहुल गांधी प्रभावी टीका करू शकले असते का? तीच गोष्ट जीनाची. भारताच्या फाळणीला जीना कारणीभूत ठरले. पण त्याच जीनांमुळे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या एका नेत्याचा पत्ता कापला गेला आणि दुसऱया नेत्याला संधी मिळाली. आता अलीगढ विद्यापीठातल्या जीनांच्या तस्विरीमुळे एकाच वेळी अनेक राजकीय नेत्यांना खळबळजनक विधाने करण्याची आणि येन केन प्रकारेण प्रसिद्धी मिळण्याची संधी मिळाली. शिवाय टीव्ही, वृत्तवाहिन्यांना यावर उलटसुलट चर्चा करून आपापले टीआरपी वाढवण्याचा मोका मिळाला. टीव्हीवरच्या परिसंवादात भाग घेणाऱया विचारवंतांना मानधन मिळाले. नेतेमंडळींना खुश करता करता जीना दमतील की काय अशा शंकेने टिपू सुलतान देखील मदतीला धावून आला आहे. तो देखील पुढाऱयांना खाद्य पुरवील. पुढाऱयांच्या विकृत गरजा भागवण्याच्या नादात गरीब बिचाऱया जनतेने जपलेल्या सामाजिक सौहार्दाला काडी लागण्याचा धोका आहे. पण लक्षात कोण घेतो?

Related posts: