|Thursday, January 23, 2020
You are here: Home » क्रिडा » माजी कसोटीपटू राजिंदर पाल कालवश

माजी कसोटीपटू राजिंदर पाल कालवश 

वृत्तसंस्था /डेहराडून :

भारतीय संघातर्फे एकमेव कसोटी खेळणारे दिल्लीचे माजी क्रिकेटपटू राजिंदर पाल यांचे बुधवारी डेहराडून येथील निवासस्थानी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. 1963-64 मध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवर त्यांनी इंग्लंडविरुद्ध कसोटी खेळली. 13 षटकात 19 धावा व 2 षटकात 3 धावा, असे पृथ्थकरण त्यांनी नोंदवले. अर्थात, त्यांना एकही बळी मिळवता आला नाही व पुढील कसोटीत त्यांच्याऐवजी रमाकांत देसाईची वर्णी लागली होती. राजिंदर यांच्यासाठी कारकिर्दीतील ती एकमेव कसोटी ठरली.

योगायोगाने राजिंदर पाल यांच्यासमवेत त्याच कसोटीत भागवत चंद्रशेखर यांनीही पदार्पण केले. पण, राजिंदर पाल यांची कसोटी कारकीर्द अगदीच अल्पजीवी ठरली तर चंद्रशेखर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भरीव यश संपादन केले. राजिंदर यांना कसोटीच्या तुलनेत प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये अधिक यश मिळाले. त्यांनी 98 प्रथमश्रेणी सामन्यात 337 बळी घेतले. यात 23 वेळा डावात 5 बळींचा पराक्रम त्यांनी गाजवला. त्यांनी रणजी क्रिकेटमध्ये दशकभराच्या कालावधीसाठी दिल्ली गाजवली तर दक्षिण पंजाब व हरियाणा या संघांचेही प्रतिनिधीत्व केले. त्या काळी रणजी स्पर्धेत पंजाबचे दोन संघ असायचे. निवृत्ती स्वीकारल्यानंतर राजिंदर कनिष्ठ क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देण्यात रमले. डेहराडून येथेच त्यांचे वास्तव्य राहिले.

काही महिन्यांपूर्वी दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या विद्यमाने आयोजित माजी राज्य कर्णधारांच्या गौरव सोहळय़ासाठी ते राजधानीत आले, त्यावेळी त्यांनी कारकिर्दीतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिवाय, टायगर पतौडी यांच्याशी असलेल्या मैत्रीचे किस्से आळवले. भारतीय क्रिकेट व्यवस्थापनाने आपला यथोचित मान राखला नाही, ही खंतही त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती.

Related posts: