|Monday, September 23, 2019
You are here: Home » क्रिडा » अफगाण कसोटीचे आयोजन अयोग्य वेळी

अफगाण कसोटीचे आयोजन अयोग्य वेळी 

माजी कर्णधार व निवड सदस्य दिलीप वेंगसरकर यांचे मत, कोहलीच्या निर्णयाचेही समर्थन

वृत्तसंस्था/ मुंबई

विराट कोहलीने अफगाणविरुद्धची सोडून इंग्लिश कौंटीत खेळण्याच्या घेतलेल्या निर्णयावरून बरेच वादविवाद होत असताना माजी कर्णधार व माजी निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी याला वेगळेच वळण दिले आहे. इंग्लंडचा महत्त्वाचा दौरा पुढे असताना ही एकमेव कसोटी आयोजित करण्यावरच त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. अगदी अयोग्य वेळी ही कसोटी ठेवली असल्याचे मत त्यांनी क्यक्त केले आहे.

‘बीसीसीआयने इंग्लंड दौऱयावर जास्त लक्ष केंद्रित करायला हवे, असे मला वाटते. त्यामुळेच अफगाणविरुद्धची कसोटी चुकीच्या वेळी आयोजित करण्यात आली आहे. भारत अ संघही इंग्लंड दौऱयावर जाणार आहे. एफटीपीनुसार दौरे आयोजित करण्यात येतात आणि त्याचे पालन करण्याची गरज आहे. असे असताना एकच कसोटी या कार्यक्रमात कोंबण्याचा प्रयत्न करणे योग्य नव्हे. कसोटीला इतके हलकेपणाने घेतले जाऊ नये. अफगाणची ही पहिलीच कसोटी असल्याने आपला ठसा उमटवण्यासाठी ते निश्चितच आतुर झाले असतील,’ असे वेंगसरकर म्हणाले. स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाने एक आंतरशालेय क्रिकेट लीगची सुरुवात केली आहे, त्याच्या शुभारंभप्रसंगी वेंगसरकर यांनी आपली मते मांडली.

कोहलीचा योग्य निर्णय

अफगाणविरुद्धची कसोटी 14 ते 18 जून या अवधीत बेंगळूरमध्ये होणार असून भारताचा इंग्लंड दौरा जुलैमध्ये सुरू होणार आहे. या दौऱयातील पहिली कसोटी 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर सलग तीन शतके झळकवण्याचा पराक्रम केलेल्या वेंगसरकर यांनी कोहलीने कौंटीत खेळण्याचा घेतलेल्या निर्णयाचे समर्थन केले. ‘कोहलीने योग्य निर्णय घेतलाय. यामुळे त्याला तेथील वातावरण व खेळपटृय़ांशी जुळवून घेण्याची संधी मिळेल. इंग्लंडच्या मागील दौऱयात त्याची निराशाजनक कामगिरी झाली होती. त्यात सुधारणा व्हावी याच हेतूने त्याने हा निर्णय घेतलाय, त्यात काहीच गैर नाही,’ असे ते म्हणाले. कोहलीने मागील इंग्लंड दौऱयात पाच कसोटीतील 10 डावांत 13.50 धावांची सरासरी राखत केवळ 135 धावा जमविल्या होत्या. पण यावेळी तो निश्चितच दमदार कामगिरी करेल, असा विश्वास वेंगसरकर यांनी व्यक्त केला.

पुजारा तेथेच खेळायला हवे

आणखी एक कसोटीपटू चेतेश्वर पुजारा कौंटीत खेळत असून अफगाण कसोटीसाठी तो मायदेशी परतणार आहे, ते वेंगसरकर यांना अजिबात पटलेले नाही. ‘मी निवड सदस्य असतो तर पुजाराला तेथेच राहून कौंटी क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला असता. कारण याच खेळाडूंना नंतर इंग्लंडमध्ये खेळायचे आहे. त्यामुळे अफगाणविरुद्ध भारतात खेळण्याला काहीच अर्थ राहत नाही. तसे पाहिल्यास पुजाराची कौंटीतही सध्या चांगली कामगिरी होत नाहीय. त्यामुळे आणखी काही काळ तेथेच खेळत राहून फॉर्म मिळविण्यावर त्याने भर द्यायला हवा होता,’ असे मत वेंगसरकर यांनी मांडले. इंग्लंडमध्ये भारताने मनगटी स्पिनरचा उपयोग करावा. लेगस्पिनरविरुद्ध इंग्लिश खेळाडू अडखळतात, हे आजवर दिसून आलेले आहे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या ऋषभ पंतने केलेल्या नाबाद 128 धावांच्या खेळीचे त्यांनी कौतुक केले.