|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गोटूरनजीक अपघातात दोन मुले ठार

गोटूरनजीक अपघातात दोन मुले ठार 

प्रतिनिधी/  संकेश्वर

 भरधाव वेगाने जाणाऱया दुचाकीची अरुंद रस्त्यावरील दगडाला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दोन मुले जागीच ठार तर अन्य दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 7.45 वाजता घडली. हा अपघात गोटूरनजीक घडला. प्रदीप जोतिबा बडगेर (वय 23) व नवीन अशोक शेखण्णावर (वय 14) अशी जागीच ठार झालेल्यांची नावे आहेत. तर विशाल अशोक शेखण्णावर (वय 16) व परशराम रवींद्र मासेवाडी (वय 12) (सर्व रा. गोटूर ता. हुक्केरी) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, प्रदीप हा आपल्या तीन मित्रांना दुचाकी क्र. (केए 23 ईआर 7532) वरून पोहण्यासाठी पी. एस. पाटील यांच्या विहिरीवर घेऊन जात होता. महामार्गानजीकच्या अरुंद रस्त्यावरून विहिरीच्या दिशेने जात असताना रस्त्यावर असणाऱया दगडाला दुचाकी धडकली. यामध्ये दुचाकीसह चौघेजण नजीकच्या शेतात पडले. अपघातात प्रदीप व नवीन यांचा जागीच मृत्यू झाला. तर विशाल व परशराम हे गंभीर जखमी झाले.

पोहण्यासाठी एकाच दुचाकीवरून हे चौघेजण जात होते. जर दुचाकीचा वेग कमी असता तर हा अपघात झाला नसता. इतक्या वेगाने मोटरसायकल दगडावर आदळली. तेवढय़ाच वेगाने पलटी होऊन शेतवाडीत घुसल्याने चौघांनाही फरफटत नेले. त्यामुळे गंभीर दुखापत झालेल्या प्रदीप व नवीन यांचा जागीच मृत्यू झाला. तर विशाल व परशराम हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना 108 रुग्णवाहिकेतून बेळगावच्या खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. अपघातातील मृत नवीन व जखमी विशाल हे सख्खे भाऊ असून नवीन ठार झाल्याची माहिती शेखण्णावर कुटुंबियांना कळताच त्यांनी एकच हंबरडा फोडला.

अपघातातील मयत प्रदीप बडिगेर हा गोटूर येथे विरभद्र केबलमध्ये काम करीत होता. तर नवीन शेखण्णावर हा गोटूर येथे कन्नड प्राथमिक शाळेत नववीचे शिक्षण घेत होता. तसेच गंभीर जखमी विशाल शेखण्णावर हा उळागड्डी खानापूर येथे अकरावीला आहे तर परशराम मासेवाडी हा गोटूर येथे सहावीचे शिक्षण घेत आहे. घटनेची नोंद संकेश्वर पोलिसात झाली आहे. उपनिरीक्षक शिवकुमार मुचंडी, मंजूनाथ कब्बूर, ए. एस. सनदी, सी. डी. पाटील या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.