|Monday, February 24, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » मुक्तिधाम, पशुपतिनाथाचे मोदींनी घेतले दर्शन

मुक्तिधाम, पशुपतिनाथाचे मोदींनी घेतले दर्शन 

     नेपाळच्या दौऱयाची सांगता : भारतविरोधी कारवाया रोखण्याचे ओली यांचे आश्वासन :

मोदींना देण्यात आली काठमांडूची चावी

वृत्तसंस्था/ काठमांडू

नेपाळच्या भूमीचा वापर भारताच्या विरोधातील दहशतवादी कारवायांसाठी होऊ देणार नसल्याचे आश्वासन तेथील पंतपधान के.पी. शर्मा ओली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शनिवारी दिले. तर दोन दिवसांच्या अखेरच्या दिवशी काठमांडूच्या महापौर विद्या सुंदर शाक्य यांनी नागरिक सन्मानाप्रित्यर्थ मोदींना शहराची चावी सोपविली. या अगोदर मोदींनी शनिवारी सकाळी मुक्तिनाथ धाम आणि भगवान पशुपतिनाथाचे दर्शन घेतले. मुक्तिधामात पूजा करणारे मोदी हे पहिले जागतिक नेते ठरले आहेत. शनिवारीच मोदी भारतात परतले आहेत.

नेपाळ भारताबद्दल संवेदशनशील आहे. नेपाळच्या भूमीचा वापर भारताविरोधात करू दिला जाणार नसल्याचे ओली यांनी म्हटले. भारत आणि नेपाळची खुली सीमा दोन्ही देशांमधील नाते आणखीन दृढ करते. भारत याचा लाभ कोणत्याही समाजकंटकांना होऊ देणार नसल्याचे मोदी म्हणाले.

ओली यांचे विधान महत्त्वाचे असून भारत याबद्दल पूर्णपणे संतुष्ट असल्याचे विधान भारताचे विदेश सचिव विजय गोखले यांनी केले. भारताच्या 5 राज्यांची 1850 किलोमीटर लांबीची सीमा नेपाळला लागून आहे. यात सिक्कीम, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडचा समावेश
आहे.

नेपाळच्या संस्कृतीचे प्रतीक

काठमांडू शहर प्राचीनता आणि आधुनिकतेचे सुंदर मिश्रण आहे. हे शहर नेपाळच्या संस्कृतीचे प्रतीक असून याचे सौंदर्य विशेष आहे. जेव्हा कधी वेळ मिळेल, तेव्हा भगवान गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ लुंबिनीला भेट देईन असे उद्गार मोदींनी काढले आहेत. 

क्रिकेटच्या माध्यमातून जोडले जातोय

आम्ही क्रिकेटच्या माध्यमातून परस्परांशी जोडले जातोय. नेपाळचा एक तरुण आयपीएलमध्ये सहभागी झाला आहे. त्याचा हा सहभाग दोन्ही देशांच्या संबंधांना आणखीन बळकटी प्रदान करेल. आणखीन अनेक क्रीडाप्रकारांच्या माध्यमातून आम्ही जोडले जाऊ शकतो असे मोदी म्हणाले.

अनेक नेत्यांच्या घेतल्या भेटी

मोदींनी दौऱयाच्या अखेरच्या दिवशी माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल आणि शेर बहादूर देउबा समवेत अनेक नेत्यांची भेट घेतली. भारत आणि नेपाळमधील संबंध वृद्धिंगत करण्याबद्दल मोदींनी त्यांच्यासोबत चर्चा केली आहे. मोदींनी राष्ट्रीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाची भेट घेत निवडणुकीत चांगल्या कामगिरीसाठी त्यांचे अभिनंदन केल्याची माहिती विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली.

मोदींच्या दौऱयावर काँग्रेसचा आरोप

कर्नाटक निवडणुकीदरम्यान मोदींच्या नेपाळ दौऱयावरून काँग्रेसने टीका केली. मोदींचे नेपाळच्या मंदिरांमधील दर्शन कर्नाटकच्या मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसने केला. परंतु सरकारकडून देखील स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ओली नेपाळचे पंतप्रधान झाल्यावर मोदींच्या दौऱयाबद्दल निर्णय झाल्याचे विदेश सचिवांनी सांगितले.

 

Related posts: