|Monday, August 19, 2019
You are here: Home » Top News » दहशतवाद्यांना थांबवायचे असेल तर भारताने पाकिस्तानवर आक्रमण करावे – रामदेव बाबा

दहशतवाद्यांना थांबवायचे असेल तर भारताने पाकिस्तानवर आक्रमण करावे – रामदेव बाबा 

ऑनलाईन टीम / पाटणा :

सीमेवरील दहशतवादी कारवाया थांबवायच्या असतील तर भारताने पाकिस्तानवर आक्रमण करायला पाहिजे, असे मत योगगुरू रामदेव बाबा यांनी व्यक्त केले. ते रविवारी बिहारच्या गया येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

प्रसारमाध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की, दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण दिले जाते, ही बाब आता सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. त्यामुळे भारताने हल्ला करून पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतला पाहिजे. दहशतवाद रोखण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. तसेच भारताने बलुचिस्तानला स्वतंत्र होण्यासाठी मदतही पुरविली पाहिजे. तेव्हाच पाकिस्तान ताळय़ावर येईल, असे रामदेव बाबांनी सांगितले. दरम्यान, कालच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मुंबईवरील हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याची कबुली दिली होती. आम्ही दहशतवाद्यांना आसरा देत नाही, असा दावा कायम पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर केला जातो. मात्र शरीफ यांच्या कबुलीने पाकिस्तानचे पितळ उघडे पडले होते. शरीफ यांच्या वक्तव्याचे राजकीय पडसाद भारतात उमटले होते. यामुळे भारताने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध घेतलेली भूमिका योग्यच होती, असे मत केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी मांडले होते.