|Monday, September 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सायबर सेलचे उपनिरीक्षक स्वप्नील पोवार निलंबित

सायबर सेलचे उपनिरीक्षक स्वप्नील पोवार निलंबित 

निरुखेतील बनावट छापाप्रकरण

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

निरुखे येथील दरोडाप्रकरणी अखेर सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पोवार यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. तर अन्य पोलीस कर्मचाऱयांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली. तसेच दरोडय़ातील संशयितांना पकडण्यासाठी पुणे येथे दोन पोलीस पथके पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

22 एप्रिलला पुणे येथील संशयितांनी सिंधुदुर्गात येऊन सिंधुदुर्ग पोलिसांशी संपर्क साधून निरुखे येथील रामदास पुरुषोत्तम करंदीकर यांनी घरात अवैधरित्या मोठय़ा प्रमाणावर रोख रक्कम, डिझेल पेट्रोलचा अवैध साठा केला आहे. त्यावर छापा टाकायचा आहे, असे सांगत आपण सरकारी अधिकारी असल्याचे भासविले. कुडाळ तालुक्यातील निरुखे येथे रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना घेऊन जात करंदीकर यांच्या घराची झाडाझडती घेतली. तेथे साडेपाच लाख रुपये रोख तसेच पेट्रोल डिझेलचे कॅन, कॅन ठेवलेली महिंद्रा पिकअप गाडी ताब्यात घेतली. पंचनामा करून कुडाळ पोलीस ठाण्यात करंदीकर यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम 3 चे उल्लंघन कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर दुसऱया दिवशी 22 एप्रिलला करंदीकर जामिनावर सुटले होते.

पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात साडेपाच लाखाची रक्कम ताब्यात घेतली. फक्त 44 हजार रुपये खर्चासाठी ठेवले होते. परंतु पंचनाम्यात 1 लाख 85 हजार 710 रुपये दाखविण्यात आले. त्यामुळे करंदीकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्याकडे तक्रार करून छाप्याची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस यांच्यामार्फत चौकशी केली. त्या चौकशीत छापा बनावट असल्याचे उघड झाले. त्यानुसार संशयितांवर कुडाळ पोलीस ठाण्यात भादंवि कलम 395, 417, 17 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना पकडण्यासाठी पुणे येथे दोन पोलीस पथके पाठविण्यात आली आहेत.

पुणे दिल्ली येथील स्पेशल स्कॉड असल्याचे भासवून करंदीकर यांच्या घरावर छापा टाकण्यास मदत करणाऱया पोलीस कर्मचाऱयांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे. तर सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पोवार यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली.