|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सिमीचे 18 सदस्य दोषी, 17 जणांची मुक्तता

सिमीचे 18 सदस्य दोषी, 17 जणांची मुक्तता 

शस्त्रास्त्रांचे अवैध प्रशिक्षण घेतल्याचा गुन्हा : एनआयए न्यायालयाचा निकाल

वृत्तसंस्था/ कोची

एनआयएच्या विशेष न्यायालयाने शस्त्रास्त्र चालविण्याचे अवैध प्रशिक्षण घेतल्याप्रकरणी सोमवारी सिमीच्या 18 सदस्यांना दोषी ठरविले तर 17 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. सिमीच्या सदस्यांना बेकायदेशीर कारवाया, स्फोटके बाळगण्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले असून मंगळवारी शिक्षेची घोषणा केली जाणार आहे.

केरळच्या कोची जिल्हय़ातील वागामोन येथे डिसेंबर 2007 मध्ये शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण शिबिर सुरू असल्याचे उघडकीस आले होते. स्टुडंट्स  इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेने हे शिबिर चालविले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) याप्रकरणी अनेक राज्यांमध्ये छापे टाकून 35 जणांना अटक केली होती.

सोमवारी विशेष न्यायाधीश कौसर एडप्पागाथ यांच्या न्यायालयासमोर दोन आरोपी हजर राहिले तर उर्वरित अहमदाबाद, भोपाळ आणि बेंगळूरच्या तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीत सहभागी झाले. एनआयएने सर्व आरोपींवर दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप देखील ठेवला होता.

केरळच्या थंगालपाडा, वागामोनमध्ये डिसेंबर 2007 मध्ये शस्त्रास्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. 10 ते 12 डिसेंबर 2007 या कालावधीत अशाप्रकारची शिबिरे कर्नाटक, मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये आयोजित करण्यात आली होती. अशाप्रकारच्या शिबिरांच्या पूर्वतयारीसाठी नोव्हेंबर 2007 मध्ये सिमीच्या पदाधिकाऱयांची बैठक झाल्याची माहिती एनआयएने न्यायालयाला दिली होती.

या शिबिरांमध्ये सिमी कार्यकर्त्यांना शारीरिक प्रशिक्षणासोबतच शस्त्र चालविणे, बॉम्ब आणि पेट्रोलबॉम्बची निर्मिती तसेच त्यांचा वापर, अत्यंत वेगाने बाइक चालविणे, टेकडय़ांवर चढण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. दहशतवादी तयार करण्यासाठी सिमीने हे पाऊल उचलले होते. याद्वारे भारत सरकारच्या विरोधात युद्ध पुकारण्याचा कट रचण्यात आला होता.