|Monday, March 30, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पावसाळी हंगामासाठी कोकण रेल्वे सज्ज!

पावसाळी हंगामासाठी कोकण रेल्वे सज्ज! 

10 जूनपासून रेल्वेची गती मंदावणार

रेल्वेमार्गाची मान्सूनपुर्व तपासणी पूर्ण

150 जवानांकडून राहणार पहारा

कटींग्सची ‘बूमलीफ्ट’द्वारे तपासणी

धोकादायक ठिकाणी अलार्म सिस्टीम

3 ठिकाणी पोकलॅन मशीन सज्ज

प्रतिनिधी /रत्नागिरी

कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक 10 जून पासून लागू होणार असून, 31 ऑक्टोबरपर्यंत गाडय़ांची गती धिमी ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत कोणाताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले असून, खबरदारीचा उपाय म्हणून धेक्याच्या ठिकाणी अलार्म सिस्टिम लावण्यात आली आहे. तसेच रेल्वेमार्गानजीक कटिंग केलेल्या डोंगरांची ‘बूमलिफ्ट’मधून पाहणी करण्यात आली असून, आवश्यक तेथे दुरुस्ती करण्यात आली असल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेंडय़े यांनी दिली.

कोकण रेल्वेच्या पावसाळी नियोजन व सज्जतेबाबत आयोजित पत्रकार परिषेदत शेडय़े यांनी प्रशासनाने आखलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. यावेळी सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक शैलेश आंबर्डेकर उपस्थित होत़े.

वीर ते कणकवली 75 किमी वेग

कोकण रेल्वेचा मार्ग डोंगरदऱयातून जात असल्यामुळे पावसाळ्यात या मार्गावर विशेष लक्ष्य ठेवले जाते. पावसाळी वेळापत्रकात या मार्गावर गाडय़ांची गती धीमी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई ते वीर या मार्गावर रेल्वेची नेहमीची गती (फुल स्पीड), वीर ते कणकवली 75 किमी आणि कणकवली ते मडुरा 90 किमी प्रतितास या वेगाने रेल्वे धावणार आहेत. सध्या कोकण रेल्वे मार्गावर सरासरी प्रतिदिवशी 53 गाडय़ा धावत आहेत़ पावसाळा पूर्व पाहणी पूर्ण झाली असून पथकाने केलेल्या सर्व सूचनांची अंमलबजावणी झाली आह़े यावर्षी पावसाळ्याचा हंगाम सुरक्षित सेवेने पूर्ण होईल, असा विश्वास शेंडय़े यांनी व्यक्त केल़ी

कटींग तपासणी पुर्णत्वाकडे

या मार्गावर 350 ठिकाणी डोंगर कापून (कटींग) रेल्वेलाईन टाकण्यात आली आहे. यातील 320 ठिकाणच्या ड्रेनेज स्वच्छतेचे काम प्रगतीपथावर असून, येथे पाणी तुंबणार नाही याची विशेष काळजी घेण्यात येत आहे. उर्वरित ठिकाणच्या कामांनाही लवकरच प्रारंभ होणार आहे. वादळी वाऱयामुळे रेल्वेमार्गावर झाडे कोसळू नयेत म्हणून या मार्गावरील धोकादायक झाडांची कटाई करण्यात आली आहे. यामध्ये आकेशिया झाडांचा प्रामुख्याने समावेश आहे. 

‘बूमलिफ्ट’द्वारे तपासणी

या मार्गावरील आगवे आणि बोरडवे या ठिकाणी उंच डोंगर असून, येथे दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन अलार्म सिस्टिम लावण्यात आली आहे. या मार्गाची पाहणी ‘बूमलिफ्ट’ या अत्याधुनिक यंत्रणेद्वारे करण्यात आली असून, या यंत्रणेमार्फत 20 मीटर उंचीपर्यंतच्या डोंगरांची पाहणी करण्यात आली आहे. या यंत्रादारे 3 माणसांना 20 मीटर उंचीपर्यंतच्या दरडीवरचे धोकादायक दगड, झाडे यांची पाहणी करता येते. आवश्यक तेथे दुरुस्तीचे उपाय करण्यात आले आहेत.

रत्नागिरी-चिपळुणात पोकलॅन सज्ज

या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता गृहीत धरून अशी घटना घडल्यास  तप्तरतेने दरड हटवण्यासाठी 3 पोकलॅन मशीन सज्ज ठेवण्यात आली आहेत. पोकलेन म्हणजे एक्सव्हेटर असलेल्या यंत्रणा कणकवली, रत्नागिरी, चिपळूण याठिकाणी तैनात असेल.

150 पेट्रोलमॅन तैनात

85 पेट्रोलमॅन रात्रीसाठी सतत गस्त घालतील तर दिवसासाठी तेच काम 65 जण करतील़ काही ठिकाणी वॉचमन ठेवण्यात येणार आहेत़ त्यांची संख्या 65 असून ते पाळ्या लावून काम करतील़ 24 तासासाठी तिघेजण कार्यरत राहतील़ 10 जूनपासून रत्नागिरीत नियंत्रण कक्ष कार्यरत राहिल़ रात्री 10 सकाळी 6 या काळात आलेले संदेश पुढे पाठवण्यात येतील़

सावित्री-वशिष्ठीवर ‘फ्लड वॉर्निंग सिस्टिम’

सावित्री, वाशिष्टी, काळ या नद्यांवर पुराची माहिती देणारी यंत्रणा (फ्लड वॉर्निंग सिस्टिम) लावण्यात आली आहे. नदीत पुराची पातळी धोकादर्शक खुणेपर्यंत पोहोचण्यापूर्वी 1 तास अगोदर संवेदक  स्टेशन मास्तर, इंजिनिअर आणि कंट्रोल रुमला धोक्याचा इशारा देतीले.  याशिवाय पाणी धोकादर्शक रेषेवर पोहोचल़े की नदीवरच्या पुलाच्या दोन्ही बाजूचे लाल सिग्नल पेटतील, अशी यंत्रणा बसवण्यात आली आह़े  या नदीत पाण्याखाली असणाऱया पुलाच्या भागाची स्कूबा डायव्हर्सकडून पाहणी करण्यात आली असून, त्याचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले आहे याशिवाय तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून पावसाळ्यातील वाहतूक सुरळीत ठेवण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न राहिल, असेही ते म्हणाल़े

Related posts: