|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शिरगावात वीज कोसळून चौघे जखमी

शिरगावात वीज कोसळून चौघे जखमी 

वार्ताहर/ खडकलाट

विजेच्या प्रचंड कडकडाटासह 15 रोजी रात्री सर्वत्र वळीव पावसाने हजेरी लावली. याचवेळी शिरगाव (ता. चिकोडी) येथील दोन घरांवर वीज पडून घरांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी यामध्ये चार लोकांना विजेची झळ बसल्याने ते जखमी झाले आहेत. मंजुनाथ निंगाप्पा बन्ने व बिराप्पा सत्याप्पा बन्ने अशी नुकसानग्रस्त घर मालकांची नावे आहेत. तर पद्मावती मंजुनाथ बन्ने (वय 25), मायाप्पा निंगाप्पा बन्ने (वय 38), ओंकार मंजुनाथ बन्ने (वय 5) व भिमव्वा राजू बन्ने (वय 5) हे जखमी झाले आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, 15 रोजी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे व पावसास सुरुवात झाली. रात्री 9 वाजता येथील घर नं. 4/150 व 4/154 या घरांवर अचानक वीज कोसळली. घरात सुमारे 10 ते 12 व्यक्ती बसले होते. पण अचानक डोळ्य़ासमोर मोठा प्रकाश पडल्याने डोळे बंद झाले. डोळे उघडल्यानंतर घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळत होत्या. सर्वत्र मोठय़ा प्रमाणात धूर पसरला होता.

घरातील सर्वजण घाबरून घरातून बाहेर पडले. तर शेजारच्या घराचेही मोठे नुकसान झाले. यामुळे आरडाओरड सुरु झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेत घरावरील कौले, भिंतीचे मोठे नुकसान झाले आहे.  टीव्ही, फॅन व इतर साहित्य जळून खाक झाले आहे. तसेच शोभेच्या व काचेच्या वस्तू फुटून सर्वत्र विखुरल्या होत्या. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली तरी चौघांना हात-पाय व सर्वांगाला जखम झाली आहे. जखमींना ताबडतोब खासगी इस्पितळात दाखल करुन उपचार करण्यात आले. घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. बुधवारी दिवसभर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.

वादळी वाऱयाने कुर्लीत घरांचे नुकसान  

कुर्ली : परिसरात जोराच्या वादळी वाऱयाने अनेक घरांचे नुकसान झाल्याची घटना 15 रोजी रात्री 8 च्या सुमारास घडली. जोराच्या वादळी वाऱयामुळे घरावरील सिमेंटचे पत्रे उडून गेले. सुमारे तासभर पावसाने हजेरी लावली. यामुळे रात्री वीजपुरवठा बंद खंडित करण्यात आला होता. 16 रोजी दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता. रंजना दत्तात्रय बेलवळे-गोंधळी यांच्या राहत्या घरावरील संपूर्ण छप्पर अँगल व सिमेंट पत्र्यासह उडून बाजूला जाऊन पडले आहे. शैलेश वडर, शहाजी वडर, संजय मगदूम यांच्या घरावरील सिमेंटचे पत्रे वाऱयाने उडून गेले आहेत. तर हुतात्मा जोतीराम चौगुले युवक मंडळाच्या व्यायाम शाळेवरील छताचे पत्रे उडून गेले आहेत. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी ग्रामपंचायत अध्यक्ष अमर शिंत्रे, पीडीओ टी. के. जगदेव यांनी केली व शासनाच्या परिहार निधीतून आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले.

संकेश्वरात वळिवाची हजेरी

  संकेश्वर : बुधवारी कडक उन्हानंतर दुपारी सुमारे 30 मिनिटे पावसाने जोरदार हजेरी लावली. मोठय़ा पावसामुळे रस्ते, गटारीतू पाणी वाहू लागले. हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला पण पाऊस थांबताच पुन्हा उष्म्याने नागरिक हैराण झाल्याचे चित्र पहायला मिळाले. मे हिटचा यंदा चांगलाच झटका बसत असून दररोज सकाळच्या टप्प्यात बसणारे उन्हाचे चटके व दुपारी निर्माण होणारे ढगाळी वातावरण, वादळी वाऱयासह पावसाच्या हजेरीने कमालीचे दूषित वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठवडाभरात उष्म्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत

Related posts: