|Friday, December 6, 2019
You are here: Home » क्रिडा » कसोटी क्रिकेटमधील नाणेफेक लवकरच रद्द होणार

कसोटी क्रिकेटमधील नाणेफेक लवकरच रद्द होणार 

आयसीसीचे संकेत, नाणेफेकीऐवजी पाहुण्या संघाला निर्णय घेण्याची मुभा मिळणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

क्रिकेट सामना कोणताही असो, त्यात नाणेफेकीचा कौल अर्थातच सर्वाधिक महत्त्वाचा. हा कौल अनुकूल लागला तर प्रतिस्पर्ध्यांची बलस्थाने नेस्तनाबूत करणे तसेच त्यांची कमकुवत बाजू हेरुन त्याचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त ठरायचा. अगदी 1877 मध्ये मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात पहिली कसोटी खेळली गेली, तेव्हापासून नाणेफेकीची पद्धत सुरु आहे. पण, कसोटीत आमुलाग्र सुधारणा करण्याच्या मोहिमेत नाणेफेक कसोटीतून रद्दबातल करण्यावर आयसीसी सध्या गांभीर्याने विचार करत आहे. नाणेफेक न करता पाहुण्या संघाच्या कर्णधाराला फलंदाजी वा गोलंदाजी निवडण्याचा पर्याय असेल, असा प्रस्ताव त्यांच्या विचाराधीन आहे.

यजमान संघ घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ घेण्यासाठी खेळपट्टी आपल्याला पोषक अशी बनवून घेतो, हा अलिखित नियमच झाला आहे. त्याचे गैर पद्धतीने फायदे घेता येऊ नयेत, यासाठीही आयसीसीने नाणेफेक रद्द करण्याचा हा प्रस्ताव आणला आहे. आतापर्यंत यजमान संघाचा कर्णधार नाणे उडवायचा व पाहुण्या संघाचा कर्णधार त्यावर कौल घ्यायचा. ती पद्धत या सुधारणेनुसार इतिहासजमा होऊ शकते. दि. 28 व 29 मे रोजी आयसीसी क्रिकेट समितीची बैठक मुंबईत होत असून त्यावेळी या प्रस्तावावर अंतिम निर्णय होईल, असे सध्याचे संकेत आहेत.

‘आयसीसी क्रिकेट समितीने सध्या याबद्दल सर्व सदस्यांना मसुदा पाठवला असून प्रत्यक्ष बैठकीत त्यावर सविस्तर चर्चा होईल व त्यानुसार निर्णय घेतला जाणार आहे’, असे यावेळी सूत्रांनी नमूद केले. ‘यजमान संघ कसोटी क्रिकेटच्या खेळपट्टीशी ज्या पद्धतीने छेडछाड करत आले आहेत, त्यावरुन या चर्चेला सुरुवात झाली आहे. पाहुण्या संघाला नाणेफेकीचा कौल बहाल केला जावा, असे एकापेक्षा अधिक सदस्य संघटनांचे म्हणणे आहे’, याचाही यात उल्लेख आहे.

आयसीसी क्रिकेट समितीमध्ये माजी भारतीय कर्णधार, प्रशिक्षक अनिल कुंबळे, ऍन्ड्रय़्रू स्ट्रॉस, महेला जयवर्धने, राहुल द्रविड, टीम मे, न्यूझीलंड क्रिकेटचे अध्यक्ष डेव्हिड व्हॉईट, पंच रिचर्ड केटलबर्ग, आयसीसी सामनाधिकारी प्रमुख रंजन मदुगले, शॉन पोलॉक व क्लेयर कॉनर यांचा समावेश असून मुंबईतील बैठकीत ते यावर निर्णय घेणार आहेत.

कौंटीमध्ये नाणेफेक नाहीच

2016 पासून कौंटी क्रिकेटमध्ये कोणत्याही लढतीत नाणेफेक होत नाही. तेथे पाहुण्या संघाच्या कर्णधारालाच ते फलंदाजी करणार की गोलंदाजी, याचा निर्णय घ्यायचा असतो. त्या पार्श्वभूमीवर, कसोटी क्रिकेटमध्येही त्याची अंमलबजावणी होऊ शकते. प्रत्यक्षात हा प्रस्ताव मंजूर झाल्यास पुढील वर्षी होणाऱया पहिल्यावहिल्या कसोटी विश्व चॅम्पियनशिपमध्ये त्याची सुरुवात होणे अपेक्षित असणार आहे.

Related posts: