|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीची जय्यत तयारी

शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीची जय्यत तयारी 

बेळगाव / प्रतिनिधी

पारंपरिक पद्धतीने बेळगाव शहरात साजऱया होणाऱया शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. कार्यकर्ते निवडणुकीच्या धामधुमीतून बाहेर पडून चित्ररथ मिरवणुकीसाठी मेहनत घेत आहेत. लागणारी वस्त्रे, देखाव्यांचे रेकॉर्डिंग, प्रकाश योजना, ध्वनी योजना, वाहने या सर्वांची जुळवाजुळव करण्यात कार्यकर्ते गुंतले आहेत.

बेळगाव शहर व उपनगरात पारंपरिक पद्धतीने मोठय़ा उत्साहात शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीमध्ये सजीव देखावे असल्याने ते पाहण्यासाठी गोवा, कोकण, कोल्हापूर भागातून शिवभक्त येत असतात. निवडणुकीनंतर लगेचच चित्ररथ मिरवणूक असल्याने कार्यकर्त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पात्रांची निवड, त्यांच्याकडून घेण्यात आलेला सराव, साहित्याची जुळवाजुळव अशी अनेक कामे या कार्यकर्त्यांना करावी लागत आहेत.

वस्त्रांसाठी ऍडव्हान्स बुकिंग

शहर व उपनगरात एकाच वेळी ही भव्य चित्ररथ मिरवणूक काढण्यात येते. सर्वच चित्ररथांवर छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मावळे यांची भूमिका असते. या कलाकारांना वस्त्रे मिळणे कठीण झाले आहे. शहरात अशा प्रकारची वस्त्रे देणारे मोजकेच असल्याने त्यांच्यावरही मर्यादा येत आहेत. त्यासाठी ऍडव्हान्स बुकिंग करून वस्त्रे दिली जात आहेत.

परीक्षांचा ठरतोय अडसर

निवडणुकांमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा मे महिन्यात ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे या परीक्षा आता सुरू होणार आहेत. परीक्षा असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी सरावास येताना दिसत नाहीत. त्यामुळे सरावामध्ये परीक्षांचा अडसर निर्माण होत आहे.