|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » नोकर भरतीत मराठा समाजाची जाणीवपूर्वक टक्केवारी वाढवली!

नोकर भरतीत मराठा समाजाची जाणीवपूर्वक टक्केवारी वाढवली! 

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

सिंधुदुर्ग जिल्हय़ात शासकीय नोकरीमध्ये मराठा समाजाचे लोक किती आहेत, याबाबत जिल्हा प्रशासनाने शासनाला सादर केलेल्या माहितीला मराठा समाजाचा आक्षेप असून जाणीवपूर्वक मराठा समाजाची टक्केवारी जास्त दाखविण्यात आल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक ऍड. सुहास सावंत यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केला. प्रशासनाला उघडे पाडण्यासाठी 23 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱयावर येत असलेल्या महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगासमोर मराठा समाजाच्या जास्तीत जास्त लोकांनी निवेदने द्यावीत, असे आवाहन त्यांनी केले.

येथे झालेल्या पत्रकार परिषदेस मराठा समाजाचे प्रभाकर सावंत, बंडय़ा सावंत आदी उपस्थित होते. ऍड. सावंत म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही या संदर्भात जनसुनावणी घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग सिंधुदुर्गात येत आहे. सामाजिक, आर्थिक मागासलेपणाची माहिती घेतली जाणार आहे. तसेच इंदिरा स्वामी विरुद्ध भारत सरकार या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे प्रत्येक जातीला आरक्षण दिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रशासनामध्ये किती टक्केवारी आहे याची तपासणी केली जाणार आहे.

दरम्यान शासनाकडून शासकीय नोकर भरतीत मराठा समाजाची टक्केवारी किती आहे, याची माहिती मागवली होती. ही माहिती देताना जिल्हा प्रशासनाने जाणीवपूर्वक टक्केवारी वाढवून दिली आहे. उदाहरण द्यायचं, तर एका विभागांतर्गत गटतीन संवर्गातील 6 हजार 361 मंजूर पदांपैकी 6 हजार 38 कर्मचारी कार्यरत आहेत आणि मराठा समाजाचे 2 हजार 304 कर्मचारी आहेत. इथे 36-22 टक्केवारी आवश्यक असताना 38.15 टक्केवारी आहे. यावरून मराठा समाजाची टक्केवारी जास्त दिसते. परंतु ही टक्केवारी जास्त दिसत असली, तरी काही पदे खेळाडू, माजी सैनिक, अनुकंपा या समांतर आरक्षणातून भरली आहेत. त्यामुळे टक्केवारी काढताना चुकीची पद्धत वापरलेली आहे. माहिती देताना प्रशासनाने भान ठेवलेले नाही. त्यामुळे आता प्रशासनाला उघडे पाडून न्याय मिळवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

मराठा समाजावर होत असलेला अन्याय दूर होण्यासाठी आणि प्रशासनाला उघडे पाडण्यासाठी 23 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱयावर येत असलेल्या महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगासमोर मराठा समाजाच्या जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून निवेदने सादर करावीत. निवेदनाची गरज असलेल्या लोकांनी मराठा समाजाच्या कुडाळ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन ऍड. सावंत यांनी केले आहे.

Related posts: