|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » व्हिएतनामसोबत भारताचा नौदल अभ्यास

व्हिएतनामसोबत भारताचा नौदल अभ्यास 

चीनच्या विस्तारवादी धोरणाला प्रत्युत्तर :संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांचा लवकरच दौरा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत-प्रशांत क्षेत्रातील देशांसोबत सैन्यसंबंध दृढ करण्याच्या धोरणांतर्गत भारत आजपासून व्हिएतनामसोबतचा नौदल अभ्यास सुरू करणार आहे. या नौदल अभ्यासाद्वारे भारताची नजर विस्तारवादी चीनवर देखील असेल. पुढील महिन्यात संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन हनोईच्या दौऱयावर जाणार आहेत.

दक्षिणपूर्व आशिया आणि उत्तर-पश्चिम भागात तैनात तीन भारतीय युद्धनौका, स्टेल्थ युद्धनौका आयएनएस सहय़ाद्री, क्षेपणास्त्र युद्धनौका आयएनएस कमोरता, आणि फ्लीट टँकर आयएनएस शक्ती सोमवारी व्हिएतनामच्या तियन सा बंदरात दाखल होतील.

21 ते 25 मे या कालावधीत दोन्ही देशांच्या नौदलाचे सदस्य परस्परांना भेटतील. तसेच व्हिएतनाम सरकारच्या प्रतिनिधींसोबत अधिकृत चर्चा होणार आहे. नौका दाखल झाल्यावर सागरी अभ्यासास प्रारंभ केला जाईल, अशी माहिती नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डी.के. शर्मा यांनी दिली.

दोन्ही देशांच्या व्यापक सामरिक भागीदारीसाठी संरक्षण सहकार्य महत्त्वाचे मानत सीतारामन जून महिन्यात द्विपक्षीय सैन्य संबंधांना बळकटी देण्याच्या उद्देशाने व्हिएतनामचा दौरा करणार आहेत. याचबरोबर व्हिएतनाम सैन्याचे प्रमुख आणि तेथील नौदलाचे कमांडर चालू वर्षी भारताला भेट देतील.

चीनला संदेश देण्याचा प्रयत्न

दोन्ही देश (भारत-व्हिएतनाम) भारत-प्रशांत क्षेत्र, विशेषत्वे वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रात चीनच्या आक्रमक भूमिकेमुळे सतर्क आहेत. मागील काही वर्षांमध्ये दोन्ही देशांनी वेगाने सैन्यसंबंध बळकट केले आहेत. सप्टेंबर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हनोईला भेट देत 50 कोटी डॉलर्सची सैन्यमदत देण्याची घोषणा केली होती. मोदींच्या दौऱयादरम्यान दोन्ही देशांनी 2015-2020 या कालावधीसाठी संयुक्त संरक्षण धोरण प्रसिद्ध केले होते. यानुसार सामरिक भागीदारीला व्यापक सामरिक भागीदारीत बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भारताने ब्राह्मोस स्वनातीत क्षेपणास्त्र तसेच आकाश क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान व्हिएतनामला पुरविण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

वैमानिकांना प्रशिक्षण

भारत लवकरच व्हिएतनामच्या लढाऊ वैमानिकांना सुखोई-30 च्या उड्डाणाचे प्रशिक्षण देणार आहे. भारताने व्हिएतनामसोबतच सिंगापूर, म्यानमार, मलेशिया आणि इंडोनेशिया यासारख्या दक्षिण आशियाई देशांशी सैन्य सहकार्य वाढविले आहे.

Related posts: